फुटबॉलच्या महासंग्रामाला कॅटीचा ग्लॅमर तडका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फिफा विश्वचषक सुरू होण्याआधीच फुटबॉलविश्वात उत्साहाला उधाण आले आहे. जगातील सर्वात मोठय़ा क्रीडा महोत्सवाला यंदा संगीत आणि ग्लॅमरची जबरदस्त जोड मिळणार असून अमेरिकन पॉप सुपरस्टार कॅटी पेरी उद्घाटन सोहळय़ात रंगमंच गाजवणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील सोफी स्टेडियमवर 12 जूनला होणाऱ्या भव्य उद्घाटन समारंभात कॅटी पेरीची तुफानी प्रस्तुती पाहायला मिळणार आहे. याच दिवशी अमेरिका आणि पराग्वे यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार असून फुटबॉलच्या थरारासोबत संगीताचा जल्लोषही चाहत्यांना अनुभवायला मिळेल.

कॅटी पेरीने स्वतः सोशल मीडियावर ही पोस्ट करत चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला. ‘फिफा विश्वचषक 2026 च्या उद्घाटन सोहळय़ात सादरीकरण करणार असल्याने मी प्रचंड उत्साहित आहे,’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या सोहळय़ात केवळ कॅटी पेरीच नव्हे, तर अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांची मांदियाळी सजणार आहे. फ्युचर, लिसा, टायला, अनित्ता, रेमा आणि डीजे संजॉय यांच्यासारखे जागतिक दर्जाचे कलाकार रंगमंचावर धमाका करणार आहेत.

आता शकीराचा 'डाय डाय'

फुटबॉल चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 2010च्या वर्ल्ड कपमध्ये ‘वाका वाका’ या सुपरहिट गीताने संपूर्ण जगाला वेड लावणारी शकीरा यंदाही विश्वचषकासाठी नवे गाणे घेऊन येत आहे. ‘डाय डाय’ नावाच्या या नव्या गाण्यात नायजेरियन स्टार बर्ना बॉयही तिच्यासोबत झळकेल.

Comments are closed.