Ratnagiri News – प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची रक्त तपासणी बंद, शिवसेनेने आरोग्य समितीच्या बैठकीत उघडकीस आणला धक्कादायक प्रकार
प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची रक्त तपासणी होत नसल्याचा धक्कादायक प्रकार आज रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्यांनी उघडकीस आणला. शासन पैसे देत नसल्याने रक्ततपासणी बंद असल्याचे खळबळजनक कारण पुढे आले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेची आरोग्य समितीची बैठक आज पार पडली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्य जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव आणि संतोष थेराडे यांनी पहिल्यापासूनच प्रशासनाची हजेरी घेतली. प्रशासकाच्या काळात आरोग्य समितीच्या बैठका अशा पद्धतीने होत होत्या का? प्रशासकाच्या काळात काही आरोग्य केंद्रांची कामे केली आणि काहींची केली नाहीत. कोणती कामे करायची हे कोण ठरवतं होते, या प्रश्नावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठरवत असल्याचे उत्तर दिले. प्रशासक काळात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची मागणी विक्रांत जाधव आणि संतोष थेराडे यांनी केली.
फुणगूस आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे पण त्याकामावर किती खर्च झाला याची विचारणा संतोष थेराडे यांनी केल्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्यात आल्याचाही प्रकार विक्रांत जाधव यांनी उघडकीस आणला. कडवईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण रूग्णालयांची कामे रखडली असल्याचे विक्रांत जाधव आणि संतोष थेराडे यांनी सांगितले. त्याचबरोबर १०८ रूग्णवाहिका व्यवस्थित चालत नसल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्यांनी निदर्शनास आणताना ८०-९० लाख रुपये खर्च करून जिल्ह्यात उभारलेले ऑक्सीजन प्लांट बंद असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आणली. आजची आरोग्य समितीची सभा वादळी झाली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार किती?
आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार किती हा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी १५ हजार ९७५ रूपये पगार मिळत असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात ७-८ हजार पगार मिळत असल्याची तक्रार सदस्यांनी बैठकीत केली.
Comments are closed.