सुवेंदूच्या पीएच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक.
बिहार-उत्तर प्रदेशमध्ये कारवाई : न्यायालयाकडून 13 दिवसांची कोठडी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी बिहार आणि उत्तर प्रदेशातील तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी उत्तर 24 परगणा जिह्यातील न्यायालयात तिन्ही संशयितांना हजर केले असता त्यांना 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यातील दोन संशयित मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य यांना बिहारच्या बक्सरमधून, तर राज सिंग याला उत्तर प्रदेशच्या अयोध्यामधून अटक करण्यात आली. यापैकी एक शार्पशूटर असल्याचा पोलिसांना संशय आहे.
चंद्रनाथ रथ हत्येप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान टोल प्लाझावर केलेले यूपीआय पेमेंट आणि सीसीटीव्ही फुटेज हे संशयितांपर्यंत पोहोचण्यास मदत करणारे सर्वात मोठे धागेदोरे ठरले. ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित मोबाईल क्रमांकांवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर दोन दिवसांनी 6 मे रोजी, उत्तर 24 परगणा जिह्यातील मध्यमग्राम येथे 42 वर्षीय चंद्रनाथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने त्यांची गाडी थांबवून अनेक गोळ्या झाडल्याने त्यांच्या छातीत आणि पोटात तीन गोळ्या लागल्या होत्या.
कुप्रसिद्ध गुन्हेगार विशालची चौकशीनंतर सुटका
बंगाल विशेष कृती दलाने (एसटीएफ) बिहारमधील बक्सर येथे कुप्रसिद्ध गुन्हेगार विशाल श्रीवास्तव याचीही चौकशी केली. तथापि, चौकशीनंतर हत्येमध्ये त्याचा कोणताही थेट सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याने एसटीएफने त्याची सुटका केली. विशालवर बक्सर जिह्यात खून, दरोडा आणि शस्त्र कायद्यासह 22 हून अधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
राज सिंग याची पार्श्वभूमी राजकीय
अयोध्या येथून अटक करण्यात आलेला राज सिंग हा बलियाचा रहिवासी आहे. त्याच्या अटकेनंतर राज सिंगबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. राजचे एक पोस्टरही समोर आले असून त्यामध्ये त्याने स्वत:ला अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा राज्य सरचिटणीस म्हणून संबोधले आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटवर मंत्री दयाशंकर सिंग यांच्यासोबतचे त्याचे फोटोही आहेत. तसेच माजी खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यासोबतचा त्याचा एक रीलही आहे.
हत्येत सहभाग असल्याचा आठ जणांवर संशय
हत्येच्या कटात आणि घटनेत किमान आठ जण सामील होते, असा संशय तपास यंत्रणांना आहे. आरोपींनी घटनेच्या अनेक दिवस आधी टेहळणी केली होती, असे प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे. हल्लेखोरांची गाडी हत्येपूर्वी बाली टोल प्लाझामधून गेली होती. गाडीतील एका व्यक्तीने यूपीआयद्वारे टोल भरला होता. या डिजिटल व्यवहाराशी संबंधित मोबाईल नंबर वापरून पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटवली आणि त्यानंतर उर्वरित आरोपींचा शोध घेतला. पोलीस आता अटक केलेल्या आरोपींची ओळख टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाच्या फोटोंशी जुळवून पाहत आहेत. हल्लेखोरांनी आपली ओळख आणि हालचाली लपवण्यासाठी विविध पद्धती वापरल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.