पठाणकोट तळाजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले.

पंजाब पोलीस कॉन्स्टेबलचे बनावट ओळखपत्र सापडले

वृत्तसंस्था/ पठाणकोट

पठाणकोट पोलिसांनी नलबंदा येथील नौशेरा हवाई तळाजवळ एका कारमधून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या तरुणांकडून पंजाब पोलीस कॉन्स्टेबलचे एक बनावट ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे. आरोपींची ओळख पटली असून सरजदिन (रा. गोगन, जि. होशियारपूर), बिल्ला (रा. हलता, जि. होशियारपूर) अशी दोघांची नावे आहेत. तिसऱ्या संशयिताचे नावही बिल्ला असे असून तो होशियारपूर येथील आहे. रविवारी रात्री सुमारे 11 वाजता, हे तिघे तरुण पांढऱ्या रंगाच्या कारमधून पंजूपूर गावातून प्रवास करत होते. पोलीस पथकाने एका तपासणी नाक्यावर गाडी थांबवून त्यांची झडती घेतली. आरोपींनी आपली ओळखपत्रे दाखवून आपण गुप्तचर कर्तव्यावर असल्याचे सांगितले. याप्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे आढळून आले. ते तिघे जण पोलिसांची ओळखपत्रे दाखवून सुरक्षा यंत्रणा आणि टोल प्लाझांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संशयित आरोपींकडून ज्या पोलीस कॉन्स्टेबलचे ओळखपत्र जप्त करण्यात आले, ते अमृतसर पोलीस लाइन्समध्ये तैनात आहेत. गाडी चालवणाऱ्या तरुणाने एक बनावट ओळखपत्र दाखवून स्वत:ची ओळख कॉन्स्टेबल सुनीर शर्मा अशी सांगितली. मात्र, त्याच्यासोबत बसलेल्या इतर दोघांकडे ओळखपत्र मागितले असता, ते कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकले नाहीत. ओळखपत्र आणि चालकाचा फोटो जुळत नसल्याने पोलिसांना संशय आला. कठोर चौकशी केल्यावर त्या तिघांनी आपण पंजाब पोलिसात नसल्याचे कबूल करून सत्य सांगितले. याप्रकरणी तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे.

Comments are closed.