मोबाईलवरून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्यांवर कारवाई
मोबाईल अप्सच्या माध्यमातून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या तिघांविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद केल्यावर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. चारकोप परिसरात काही जण मोबाईलवरून क्रिकेट बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी चारकोप येथे छापा टाकला. छापा मारून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त केले. ते तिघे मोबाईलवरून एका वेबसाईटवरील अप्सवरून क्रिकेट बेटिंग करत असल्याचे उघड झाले. त्या तिघांनी अनेकांकडून बेटिंग घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घडल्याप्रकरणी त्या तिघांविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पोलिसाच्या घरातून पाच लाखांचा ऐवज लांबवला
माटुंगा पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस वसाहतीमध्येच घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. एका पोलीस अंमलदाराच्या बंद घरातून अज्ञात चोराने जवळपास पाच लाख 83 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस अंमलदार एकनाथ चौधरी (58) हे माटुंगा पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलीस वसाहतीमधील इमारत क्रमांक बी 91 मध्ये राहतात. ते घर बंद करून बाहेर गेले होते. हीच संधी साधत चोराने बंद घरात घुसून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा पाच लाख 83 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस वसाहतीतच चोराने घर साफ केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माटुंगा पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
Comments are closed.