NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन? 42 प्रश्न जुळल्याच्या तक्रारीनंतर क्लासेसची चौकशी सुरू
NEET पेपर लीक लातूर कनेक्शन : NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात नाशिकनंतर आता लातूरचे नाव समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू केली आहे. मॉक टेस्टमध्ये दिलेले तब्बल 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीमुळे संबंधित क्लासेसचा पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला असून राज्यभरात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Latur Investigation NEET : पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा तपास
एका विद्यार्थिनीच्या पालकांनी 12 मे रोजी लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी तक्रार दिली. या तक्रारीत, परीक्षा होण्यापूर्वी खासगी क्लासेसने दिलेल्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न NEET (UG) 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत आल्याचा दावा करण्यात आला.
Police Inquiry NEET Paper Leak : पोलीस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश दिले
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समरजीत साळवे यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
NEET Nashik Connection : नाशिकमधून पेपर सर्वप्रथम फुटल्याचा दावा
दरम्यान, NEET पेपरफुटीचे नाशिक कनेक्शनही समोर आले आहे. नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने कथितरित्या 15 लाख रुपयांना पेपर विकल्याची माहिती समोर आली आहे. Central Bureau of Investigation (CBI) त्याची चौकशी करत असून पुढील तपासासाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
NEET UG 2026 रद्द : 2.2 लाख विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल
NEET UG 2026 ही परीक्षा 3 मे 2026 रोजी झाली होती. देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पेपर 42 तास आधीच लीक झाल्याच्या आरोपांनंतर National Testing Agency (NTA) ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
NEET Re Exam Rules : पुन्हा नोंदणी किंवा अतिरिक्त शुल्काची गरज नाही
NTA ने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बहुतांश विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा त्याच केंद्रांवर घेतली जाण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक आणि प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत.
Political Reaction : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
2024 मध्येही नीटचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे आता विरोधकांनी केंद्रावर जोरदार तोंडसुख घेतलं आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्नं भ्रष्ट व्यवस्थेनं चिरडून टाकल्याचे ताशेरे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी ओढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा फुटल्याचं समोर आलं. नाशिकनंतर हरियाणा आणि देशाच्या इतर भागात हा गेस पेपर पोहोचला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.