‘लोकां सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी भाजपाची स्थिती; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर नाना पटोले यांचे टिकास्त्र
राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून किती राज्यांमध्ये सत्ता मिळवली याची जाहिरात केली. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजप सरकारमधील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि स्वतः पंतप्रधान कसे वागतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी अशाच कठीण परिस्थितीत स्वतःपासून काटकसरीची सुरुवात केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनीही स्वतः उदाहरण घालून दिले होते. त्यांनी देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र, भाजप सरकारकडून अशा प्रकारच्या जबाबदार भूमिकेची अपेक्षा कुणालाही वाटत नाही.
हिंदुस्थानने यापूर्वी कधीही कोणत्याही देशासमोर शरणागती पत्करलेली नव्हती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची स्वायत्तता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. देशाला अमेरिकेसमोर गहाण ठेवण्याचे काम झाले आहे.
राज्यातील अनेक मंत्री आज गुवाहाटीला गेले आहेत. दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगायचे आणि स्वतः मात्र ऐशोआरामात राहायचे, ही भाजपची भूमिका आहे. युद्धकाळात लालबहादूर शास्त्री यांनी स्वतःपासून काटकसर सुरू केली होती. त्यावेळी देशातील महिलांनी स्वतःचे दागिने देऊन देशाला मदत केली. मात्र, आजचे सरकार स्वतः ऐशोआरामात राहून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे असेही नाना पटोले म्हणाले.
Comments are closed.