पेट्रोलियम मंत्र्यांनी दिला इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यपूर्वेतील युद्धस्थिती अद्याप सुधारलेली नसली तरी भारतात इंधनाचा पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, हा संघर्ष असाच बराच काळ होत राहिला, तर भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर मोठा दबाव येऊ शकतो, असा इशारा पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिला आहे.

भारतात पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई नाही. आम्ही पर्यायी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनही आम्हाला तेल आणि वायू यांचा पुरवठा होत आहे. तथापि, या संघर्षात्मक परिस्थितीमुळे कच्च्या इंधन तेलाच्या दरात वाढ होत आहे. तो सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. कच्च्या इंधन तेलाने प्रतिबॅरल 110 डॉलर्सची पातळी गाठली आहे. मे महिन्यातील सरासरी दर आतापर्यंत 100 हून अधिक डॉलर इतका आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना मोठा तोटा होत आहे. त्यांचा खरेदी खर्च 80 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. मात्र विक्री दरात वाढ झालेली नाही. परिणामी, पेट्रोल किंवा डिझेल ग्राहकांना आहे त्याच दरांमध्ये मिळत असले तरी तेल कंपन्यांना तोटा होत आहे. ही स्थिती फार काळ अशीच ठेवणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा संघर्ष लवकरात लवकर संपावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

गॅसचे उत्पादन वाढविणार

इंधन वायूचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने योजना सज्ज केली असून दिवसाला उत्पादन क्षमता 54 हजार टन इतकी करण्यावर भर दिला जाणार आहे. भारताला साधारणत: दरवर्षी 4 कोटी टन इंधनवायूची आवश्यकता भासते. त्यापैकी 40 टक्के उत्पादन देशात होते, तर 60 टक्के उत्पादन आयात करावे लागते. देशांतर्गत उत्पादन वाढविण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तेलदरात वाढ होणार काय?

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. तथापि, मध्यपूर्वेतील संघर्ष असाच आणखी काही काळ होत राहिला, तर मात्र सध्याची तारेवरच्या कसरतीची स्थिती अशीच राखणे अवघड होणार आहे. आज अमेरिकेसह प्रत्येक देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. काही देशांमध्ये तर दर युद्धपूर्व काळाच्या दुप्पट वाढले आहेत. भारताने अद्यापपावेतो आहे तेच दर धरुन ठेवण्यात यश मिळविले आहे. सर्वसामान्यांना महागाईचा त्रास होऊ नये, ही भूमिका त्यामागे आहे. मात्र, येत्या काही आठवड्यांमध्ये तोडगा निघाला नाही, तर मात्र, काय होईल, ते सांगता येणे कठीण आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Comments are closed.