Mango Ripening Tips: घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याची सोपी ट्रिक
उन्हाळा म्हटलं की रसाळ, गोड आंब्यांची आठवण येतेच. बाजारात सध्या विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दिसत असले, तरी अनेक जण रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांमुळे चिंतेत असतात. त्यामुळे आता अनेकांचा कल घरीच नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याकडे वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे यासाठी भुसा, पोते किंवा लाकडी पेटीची गरज नसते. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंच्या मदतीनेही आंबे छान गोड आणि नैसर्गिकरित्या पिकवता येतात.
वर्तमानपत्राच्या मदतीने पिकवा आंबे
आंबे पिकवण्यासाठी सर्वात सोपी आणि घरगुती पद्धत म्हणजे वर्तमानपत्राचा वापर. यासाठी सर्वप्रथम एखादं पसरट भांडं, टोपलं किंवा दुरडी घ्या. त्यामध्ये खाली वर्तमानपत्राचा जाड थर पसरवा. जर आंबे जास्त असतील, तर जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर वर्तमानपत्र अंथरू शकता. आता त्यावर एकेक आंबा अंतर ठेवून ठेवा. आंबे पूर्ण झाकणं महत्त्वाचं आंबे ठेवून झाल्यानंतर त्यावर पुन्हा वर्तमानपत्र घाला. आंब्यांना कुठूनही हवा लागू नये याची काळजी घ्या. एखादा भाग उघडा राहिला तर आंबे व्यवस्थित पिकत नाहीत किंवा खराब होण्याची शक्यता वाढते. यानंतर त्यावर जाडसर कापड, चादर किंवा बेडशीट झाकून ठेवा.
4 ते 5 दिवसांत सुरू होईल पिकण्याची प्रक्रिया आता हे आंबे ४ ते ५ दिवस तसेच ठेवून द्या. या काळात आंब्यांमधून नैसर्गिकरित्या इथिलीन वायू तयार होतो, ज्यामुळे ते हळूहळू पिकू लागतात. दररोज आंबे तपासत राहा आणि जे आंबे पिकलेले दिसतील ते वेगळे काढून ठेवा.
ही काळजी नक्की घ्या.
खराब किंवा कुजलेले आंबे इतरांमध्ये ठेवू नका.
आंबे पाण्याने धुऊन लगेच पिकत ठेवू नयेत.
खूप उष्ण जागी आंबे ठेवणे टाळा.
हवेशीर पण थेट सूर्यप्रकाश नसलेल्या जागेत आंबे ठेवा.
नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे का चांगले?
घरी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे अधिक गोड, रसाळ आणि सुरक्षित मानले जातात. रसायनांचा वापर टाळल्यामुळे त्यांच्या चवीसोबत आरोग्याचाही फायदा होतो.
Comments are closed.