पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये पोहोचणार : युरोपीय देशांसोबतचा व्यापार वृद्धींगत होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15-20 मे दरम्यान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटादरम्यान ते प्रथम युएईला भेट देणार असून तेथे ऊर्जा सुरक्षा आणि क्षेत्रीय स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी हे 15 मे रोजी युएईत पोहोचतील आणि अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. बैठकीत ऊर्जा सहकार्य, क्षेत्रीय स्थिती आणि भारत-युएई व्यापक रणनीतिक भागीदारीवर चर्चा होणार आहे.

युएई हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे आणि तेथे 45 लाखाहून अधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. पश्चिम आशिया संकट आणि होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद असल्याने जागतिक ऊर्जा बाजारावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. भारताचा तेलपुरवठा आणि ऊर्जा सुरक्षा पाहता या दौऱ्याला अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

नेदरलँडचा दौरा

पंतप्रधान मोदी हे 15-17 मेपर्यंत नेदरलँडमध्ये असतील. यादरम्यान नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन, राजे विलेम-अलेक्जेंडर आणि महाराणी मॅक्सिमा यांना ते भेटणार आहेत. तर द्विपक्षीय बैठकांमध्ये संरक्षण, सुरक्षा, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि जलसुरक्षा तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.

भारत-नॉर्डिक परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17-18 मे या कालावधीत स्वीडन आणि 18-19 मेदरम्यान नॉर्वेच्या दौऱ्यावर असतील. नॉर्वेच्या ओस्लोमध्ये 19 मे रोजी तिसरी इंडिया-नॉर्डिक परिषद आयोजित होणार आहे. या परिषदेत ग्रीन ट्रान्जिशन, ब्ल्यू इकोनॉमी, संरक्षण, अंतराळ आणि नव्या तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.

इटलीमध्ये उच्चस्तरीय चर्चा

दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी हे 19-20 मेदरम्यान इटलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्रपती सर्जियो मातारेला यांच्याशी मोदी चर्चा करतील. तर द्विपक्षीय बैठकांध्ये भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, संरक्षण सहकार्य आणि स्वच्छ ऊर्जेवर चर्चा होणार आहे.

Comments are closed.