Neet Exam नीट पेपरफुटीचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत, CBI ने संशयिताला घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशभरात संतापाची लाट उसळविणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि गुणांमध्ये फेरफार यामुळे आधीच देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव वाढला होता. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्यात आला असून देशभरातील विविध राज्यांमध्ये तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

याच तपासाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून CBI चे विशेष पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित व्यक्तीचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दिवसभर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या व्यक्तीचा पेपरफुटी रॅकेटशी नेमका काय संबंध आहे, प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या साखळीत त्याची भूमिका होती का, आर्थिक व्यवहार झाले होते का, यासह अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “CBI कडून चौकशी सुरू असून स्थानिक पोलिसांनी आवश्यक ती मदत केली आहे,” एवढीच अधिकृत माहिती दिली. संबंधित व्यक्तीला पुढील चौकशीसाठी कुठे नेण्यात आले, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत किंवा पुढील कारवाई काय होणार याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कारवाईमुळे आता नीट पेपरफुटी प्रकरणाचे जाळे महाराष्ट्रातही खोलवर पसरल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवीन धागेदोरे समोर येत असून आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये या प्रकरणामुळे तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments are closed.