जनसुनावणीच नाही तर बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा देणार; शिवसेनेचा निर्धार
राजापूर तालुक्यातील नाणार-कुंभवडे आणि सागवे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची २० आणि २८ मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द झाली असली तरी बॉक्साईट उत्खनन प्रकल्प रद्द होईपर्यंत हा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने व्यक्त केला आहे.
प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेनेने आवाज उठवला होता. शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी बॉक्साईट प्रकल्पाच्या जनसुनावणीला विरोध केला होता. जनसुनवाणी रद्द झाली नाही तर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ती जनसुनावणी उधळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला होता.त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही जनसुनावणी रद्द केली आहे.
बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे पर्यावरण आणि आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि शिवसैनिकांनी प्रकल्पाला विरोध केला आहे.
प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा
फक्त जनसुनावणी रद्द होणे पुरेसे नाही. संपूर्ण बॉक्साईट उत्खनन प्रकल्प रद्द झाला पाहिजे. त्याकरिता आम्ही शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढत रहाणार आहोत.कोकणच्या निसर्गाशी,मातीशी आणि जनजीवनाशी कुणालाही खेळू देणार नाही असे राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी सांगितले.
Comments are closed.