मंत्रोच्चाराने मुतखडा बरा करतो, मनोहर भोसलेने एकाला 41 हजारांना लुटलं; करमाळ्यात गुन्हा दाखल

मनोहर भोसले फसवणूक प्रकरण : भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन देत एका शेतकऱ्याकडून 41 हजार रुपये उकळल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील घोटी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मनोहर भोसले (Manohar Bhosale) आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दिलीप अजिनाथ राऊत (वय 52) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 मध्ये त्यांना मुतखड्याचा त्रास सुरू झाला होता. वैद्यकीय उपचार करूनही आराम न मिळाल्याने ते 20 जानेवारी 2026 रोजी मनोहर भोसले यांच्या मठात गेले.

Kidney Stone Treatment Fraud : उपचाराच्या नावाखाली पैशांची उकळणी

मठात प्रवेश केल्यानंतर सेवेकऱ्यांनी मनोहर भोसलेची भेट घडवून आणण्यासाठी राऊत यांच्याकडून 11 हजार रुपये घेतले. कोणतीही पावती न देता ही रक्कम स्वीकारण्यात आली. भेटीदरम्यान मनोहर भोसलेने आजार पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन देत लाल रंगाची पावडर दिली. काही दिवस आराम वाटल्यानंतर राऊत पुन्हा मठात गेले असता त्यांच्याकडून 80 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी 30 हजार रुपये रोख दिले.

Manohar Bhosale Black Magic Claim : करणी झाल्याचे सांगून पुन्हा फसवणूक

काही दिवसांनी त्रास पुन्हा वाढल्यावर राऊत यांनी विचारणा केली असता, त्यांना “तुमच्यावर बाहेरवसा म्हणजेच करणी करण्यात आली आहे” असं मनोहर भोसलेने सांगितलं. त्यानंतर मंत्रोच्चार केलेली पावडर देण्यात आली.

औषधाचा कोणताही फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राऊत यांनी एप्रिल 2026 मध्ये पैसे परत मागितले. मात्र मनोहर भोसले याने पैसे परत देण्यास नकार देत त्यांना मठातून बाहेर काढल्याचा आरोप आहे.

Manohar Bhosale Threat Allegation : तक्रार करू नका म्हणून दमदाटी

6 मे 2026 रोजी शिवाजी शहाजी वाघमारे आणि अप्पा शिवाजी जाधव हे दोघे राऊत यांच्या घरी गेले. पोलिसांत तक्रार करू नका, पैसे परत देतो असं सांगून त्यांनी दबाव आणल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यामुळे अखेर दिलीप राऊत यांनी करमाळा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.

Manohar Bhosale Police Case : जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा

या प्रकरणी मनोहर भोसले, शिवाजी शहाजी वाघमारे, अप्पा शिवाजी जाधव आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करमाळा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.