जगात फक्त चीन-अमेरिकाच महासत्ता , ट्रम्प तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर; मस्क यांच्यासह 17 सीईओ सोबतीला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणविरुद्धचे युद्ध अद्याप थांबलेले नसतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बुधवारी चीन दौऱ्यावर पोहोचले. ट्रम्प यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून त्यांच्या या दौऱयात उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासह 17 सीईओ सोबत आहेत. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जगात केवळ अमेरिका आणि चीन महासत्ता आहेत. अमेरिकेकडे सर्वात मोठी लष्करी ताकद असून चीन दुसऱया नंबरवर आहे.

इराणविरोधात लढाई लढताना चीनची भूमिका मवाळ करण्यासाठी चीनचा दौरा आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, मला नाही वाटत इराण प्रकरणात आम्हाला अन्य कोणाच्या मदतीची गरज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थिती हे युद्ध जिंकू. मग ते शांततापूर्ण पद्धतीने असो की अन्य दुसऱया पद्धतीने. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते न्यूयॉर्कहून चीनच्या बीजिंग विमानतळावर पोहोचले. चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांनी ट्रम्प यांचे विमानतळावर स्वागत केले. ट्रम्प हे 15 मेपर्यंत चीन दौऱयावर असतील. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत उद्या बैठक होणार आहे. 8 वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱयावर पोहोचले आहेत. इराण विरुद्ध युद्ध सुरू असताना ट्रम्प हे चीन दौऱयावर गेल्याने या दौऱयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिग्गज सोबत

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत या दौऱयात टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अॅपलचे टीम कुक, बोइंगचे ऑर्टबर्ग, ब्लॅकरॉकचे लॅरी, गोल्डमन सॅक्सचे सोलोमन आणि सिटीग्रुपच्या फ्रेझर यांच्यासह 17 मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देखील आहेत. मात्र, एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांचे नाव या यादीत नाही. ट्रम्प यांचे गुरुवारी अधिकृत स्वागत होईल. त्यानंतर चीनचे राष्ट्रापती शी जिनपिंग यांच्या सोबत बैठक होईल. दोन्ही नेते 15 व्या शतकातील ऐतिहासिक स्मारक ‘टेंपल ऑफ हेवन’ला भेट देतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांसाठी स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

शी जिनपिंग वेलकम करायला विमानतळावर आले नाही

बुधवारी सायंकाळी ट्रम्प यांच्या विमानाचे बीजिंग पॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग झाले. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे पोहोचले नाहीत. त्यांनी उपराष्ट्रपती हान झेंग यांना पाठवले. ट्रम्प यांच्या विमानतळावरील स्वागताचे पह्टो व्हायरल झाले असून यात शी जिनपिंग दिसत नाहीत. चीनमधील परंपरेनुसार, राष्ट्रपती कधीही स्वागतासाठी विमानतळावर जात नाहीत. ते पाहुण्यांना चीनचा राजवाडा अर्थात ’ग्रेट हॉल ऑफ द पीपल’मध्ये भेटतात. ट्रम्प यांचे उद्या जंगी स्वागत केले जाईल. त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल.

Comments are closed.