IPL 2026 – मुंबईचा विजय ‘तिलक’, पंजाबचा सलग पाचवा पराभव; प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका
धर्माशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर शेवटच्या षटकपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने पराभव केला. मुंबईकडून तिलक वर्माने शेवटपर्यंत नाबाद राहत 75 धावांची झुंजार खेळी केली. पंजाबचा हा सलग पाचवा पराभव आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबवर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 8 बादग 200 धावा उभारल्या. पंजाबची अवस्था एकवेळ 7 बाद 140 अशी बिकट होती, मात्र अजमतुल्लाह उमरजईने 17 चेंडूत 38, विष्णू विनोदने 8 चेंडूत 15 आणि झेवियर बार्टलेटने 7 चेंडूत 18 धावा चोपत पंजाबचा दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 4 षटकात 39 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, तर दिपक चहरने 2 आणि राज बावा, कॉर्बिन बॉसने प्रत्येकी एक विकेट घेतली.
अविश्वसनीय पाठलाग, अविश्वसनीय खेळाडू
टिळक वर्मा मोसमातील सर्वात मोठी चोरी करत आहेत
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/idtc2OTLbP#TATAIPL | #खेलबिंदास | #PBKSvMI | @mipaltan pic.twitter.com/DHAvUhHniK
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 14 मे 2026
पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातच दमदार झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या जोडीने 61 धावांची सलामी दिली. रोहित 25, तर रिकल्टन 48 धावा काढून बाद झाला. त्यानंतर नमन धीरही 9 धावांवर माघारी परतला. आघाडीचे तीन बॅटर बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि रुदरफोर्ड यांनी मोर्चा सांभाळत अर्धशतकीय भागिदारी केली. सामना हातात आला असे वाटत असतानाच रुदरफोर्ड 20 धावांवर बाद झाला. त्यांतर तिलक आणि विल जॅक्सने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत मुंबईला 1 चेंडू बाकी असताना विजयी केले. विल जॅक्स 25, तर तिलक वर्मा 75 धावा काढून नाबाद राहिला.
Comments are closed.