'NEET' घोटाळ्याचा 'उघड' क्षितिजावर आहे का?

मुख्य सूत्रधाराला अटक, ‘मनी ट्रेल’चा शोध घेणार

वेगाने अन्वेषण

  • नीट प्रश्नपत्रिका प्रकरणाचे वेगाने अन्वेषण करण्याचा सीबीआयचा प्रयत्न
  • आतापर्यंत आठ जणांना अटक, मुख्य सूत्रधारही ताब्यात आल्याची माहिती
  • या प्रकरणाच्या अर्थकारणाचा मागोवा घेण्यासाठी सीबीआय पथके सज्ज

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

‘नीट’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात सीबीआयला यश मिळाले आहे. यश यादव असे त्याचे नाव असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. यादव याने प्रथम फुटलेली प्रश्नपत्रिका राजस्थानात नेली आणि तिची 2 लाख ते 5 लाख रुपयांना अनेक विद्यार्थ्यांना विक्री केली, असे सीबीआयचे म्हणणे आहे. यश यादव याचे संबंध या प्रकरणातला आणखी एक आरोपी विकास बिवाल याच्याशी असून बिवाल हा राजस्थानतील नागरीक आहे.

विकास बिवाल याचे वडील दिनेश बिवाल यांनी मुद्रणालयातून फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची कागदी प्रत मिळविली आणि तिचे ‘पीडीएफ’मध्ये रुपांतरण केले. आरोपीने प्रथम प्रश्नपत्रिका हाताने लिहून उतरवून घेतली. त्यानंतर ती ‘स्कॅन’ केली. नंतर तिचे पीडीएफमध्ये रुपांतरण करण्यात आले. ही प्रश्नपत्रिका राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील काही शिकवणी वर्गांमध्ये वितरीत करण्यात आली, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. आरोपीला बुधवारी रात्री उशीरा जयपूर येथील महानगर दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित करण्यात आले.

कोचिंग क्लासेसचीही चौकशी

सीबीआयने राजस्थानातील अनेक कोचिंग क्लासेसच्या चालकांचीही या प्रकरणी चौकशी चालविली आहे. या क्लासेसमध्ये काम करणारे कर्मचारी, शिकविणारे शिक्षक यांनाही प्रश्न विचारले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका विकत घेतल्या आहेत, त्यांचा तपास केला जात असून आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे. 2 लाख रुपये ते 5 लाख रुपये किमतीला या प्रश्नपत्रिका विकत मिळाल्या आहेत, अशी कबुली अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे. प्रमुख आरोप यश यादव हा मात्र गेल्या वर्षीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला नाही.

फुटीच्या स्रोताचा शोध

सीबीआयकडून सध्या प्रश्नपत्रिका फुटीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे. तसेच ज्या साखळीतून या प्रश्नप्रतिकेचे अनेकांना वितरण करण्यात आले, त्या साखळीचाही पत्ता लावला जात आहे. प्रश्नपत्रिका विकत घेतलेले विद्यार्थी आणि आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी यांचे म्हणणे नोंदवून घेतले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यात यश मिळेल आणि या प्रकरणाच्या अर्थकारणाचा मागोवा घेता येईल, असा विश्वास सीबीआयला आहे.

बिवाल कुटुंबातील पाच जण

या प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात असणाऱ्या राजस्थानातील बिवाल कुटुंबातील पाच जण वैद्यकीय शिक्षण घेत आहेत, किंवा त्यांनी ते घेतलेले आहे, असेही समोर आले आहे. बिवाल आणि यश यादव यांना प्रश्नपत्रिका कशी मिळाली, याचा शोध घेतला जात आहे. प्रश्नपत्रिकांचे मुद्रण करणाऱ्या मुद्रणालयाचे कर्मचारी आणि चालक यांचीही कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली.

प्रकरण काय आहे…

3 मे या दिवशी देशभरात आणि विदेशांमधील केंद्रांवर नीटची प्रवेश परीक्षा घेण्यात आली. भारत आणि अन्य देशांमधील साधारणत: 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मात्र, परीक्षेच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत, हे परीक्षा झाल्यानंतर एका आठवड्यात लक्षात आले. त्यानंतर तपासाची चव्रे फिरु लागली. तपास यंत्रणांनी काही विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात आली. परिणामी, तपास सीबीआयकडे देण्यात आला असून तो त्वरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत सीबीआयने आठ जणांना अटक केली असून घोटाळ्याचे धागेदोरे कोठपर्यंत पोहचले आहेत, याचा शोध होत आहे. केंद्र सरकारने 3 मे ला झालेली पूर्ण परीक्षाच रद्द केली असून आता ती नंतर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे नवे वेळापत्रक येत्या 10 दिवसांमध्ये घोषित होईल.

Comments are closed.