सिंधूची घोडदौड; सात्त्विक-चिराग विजयी
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत ‘थायलंड ओपन सुपर-५००’ बॅ डमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. याचबरोबर सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या अव्वल जोडीनेही दमदार विजयासह आगेकूच केली.
महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा अवघ्या २८ मिनिटांत २१-१३, २१-१५ असा धुव्वा उडविला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढू दिले नाही. याआधी पहिल्या फेरीत तिने चायनीज तैपईच्या तुंग सिऊतोंगचा २१-९, २१-१२ असा सहज पराभव केला होता. आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर जपानची विद्यमान जगज्जेती अकाने
यामागुचीचे कडवे आव्हान असेल. दोघींमध्ये आतापर्यंत २८ सामने झाले असून त्यात सिंधू १५-१३ अशी आघाडीवर आहे.
पुरुष दुहेरीत हिंदुस्थानची अव्वल मानांकित सात्त्विक चिराग जोडी पुन्हा एकदा तुफानी लयीत दिसली. मलेशियाच्या ब्रायन जेरेमी गूंटिंग आणि मोहम्मद हैकाल या जोडीचा त्यांनी २१-१२, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या दोन्ही जोड्यांमधील ही पहिलीच लढत होती आणि हिंदुस्थानी जोडीने अप्रतिम समन्वय दाखवत विजय खेचून आणला.
Comments are closed.