अतिक्रमण हटवून वहिवाटीचा रस्ता तात्काळ खुला करा! ग्रामपंचायतीने बजावली नोटीस, वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जाग
>> चेहरा प्रभाव
कोणतीही कारवाई न करताच पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात रवींद्र गोरखना यांचा अर्ज निकाली काढण्यात आला होता. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग आलेल्या तलवाडा ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करत अतिक्रमण हटवून वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री गणेश नाईक यांचा पालघरमध्ये सहावा जनता दरबार 8 मे रोजी होता. मात्र अर्ज देऊनही न्याय न मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गावातील रवींद्र गोरखना यांना आला होता. रवींद्र यांना घरकुल मंजूर झाले होते. मात्र वहिवाटीचा रस्ता नाशिक पवार यांनी अडवल्याने न्याय मिळवण्यासाठी रवींद्र गोरखना यांनी वर्षभरापूर्वी जनता दरबारात धाव घेतली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पालकमंत्र्यांकडे अर्ज देऊन एक वर्ष उलटल्यानंतरही ठोस कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने तो अर्ज कोणताही निर्णय न घेता निकाली काढला होता.
दोन दिवसांत कारवाई
दैनिक ‘सामना’ने ‘समस्यांचे निवारण न होताच अर्ज निकाली; नाईकांच्या जनता दरबारात न्यायच नाही’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची पाचावर धारण बसली. तलवाडा ग्रुप ग्रामपंचायतने नाशिक पवार यांना नोटीस देऊन वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यास ते अतिक्रमण ग्रामपंचायत हटवेल आणि त्यासाठी लागणारा खर्च वसूल करेल असे नोटीसीत म्हटले आहे. पवार अतिक्रमण हटवतात की ग्रामपंचायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.