महिलेचे केस कापले, गळ्यात चपलांचा हार घालत भर रस्त्यात धिंड; उल्हासनगरमध्ये जातपंचायतीचे कृत्य
ठाणे : उल्हासनगरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. जातपंचायतीच्या कथित निर्णयानंतर एका कुटुंबाला समाजाच्या मंदिरात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र संबंधित कुटुंबातील सदस्य मंदिर परिसरात दिसून आल्याने 30 ते 40 जणांच्या जमावाने त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता एका महिलेच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून तिची दीड किलोमीटरपर्यंत धिंड काढण्यात आली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी केवळ मारहाणीचे कलम दाखल करण्यात आलं आहे, त्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Ulhasnagar Jat Panchayat Violence: मंदिरात गेल्याच्या रागातून कुटुंबावर हल्ला
उल्हासनगर-3 मधील वाघेलानगर चौक परिसरात राजपूत आणि वाघेरी समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी समाजाची बैठक पार पडली होती. या बैठकीत एका राजपूत कुटुंबावर कथित गैरवर्तनाचा आरोप करत त्यांना समाजाच्या मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती.
मात्र, बंदी असतानाही संबंधित कुटुंबातील एक सदस्य मंदिर परिसरात दिसून आल्याने जमाव संतप्त झाला. त्यानंतर कुटुंबाला अडवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ulhasnagar Woman Parade Case : पोलिस ठाण्यात जात असतानाच भररस्त्यात मारहाण
14 मे रोजी सकाळी फिर्यादी आपली बहीण गीता राजपूत आणि मुलगी अंजली यांच्यासह मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. त्यावेळी तरुण मित्र मंडळ परिसरात आरोपींनी त्यांना अडवले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी नितीन थोरात याने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केला. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. महिलांनाही मारहाण करण्यात आली.
Ulhasnagar Crime News: केस कापले, कपडे फाडले आणि चप्पलांचा हार घालून धिंड
तक्रारीनुसार, आरोपी ज्युली वाघरी आणि विणू वाघरी यांनी एका महिलेचे केस कापले. तसेच तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून भररस्त्यातून धिंड काढण्यात आली. साधारण दीड किलोमीटरपर्यंत ही धिंड काढण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
Ulhasnagar Police Action: सात जणांविरोधात गुन्हा, दोन आरोपी अटकेत
या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर संताप व्यक्त करण्यात आला. मात्र महिलांची धिंड काढणे, केस कापणे आणि सार्वजनिक अपमान यांसारख्या गंभीर आरोपांमुळे आणखी कलमे वाढवली जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.