मध्यरात्रीची दुर्घटना, ठाणेकर हादरले; गावदेवी मार्केटमध्ये अग्नितांडव, सुरक्षारक्षकासह अग्निशमन जवानाचा मृत्यू

अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या ठाण्यातील गावदेवी मार्केटमध्ये आज मध्यरात्री अग्नितांडव घडले. या दुर्घटनेत सगळी दुकाने बेचिराख झाली. अख्खी इमारत धुराने कोंडली. या धुराने घुसमटून पालिकेचे सुरक्षारक्षक काळू गाडेकर (53) आणि अग्निशमन केंद्राचे अधिकारी सागर शिंदे (43) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अग्निशमन दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले. पालिकेच्या विविध यंत्रणांनी तब्बल पाच तास शर्थीची झुंज देत ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य खाक झाले. जखमी अग्निशमन जवानांवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ठाणे रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गोखले रोड येथे गावदेवी मार्केट आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये आगडोंब उसळला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत तेथील सगळे गाळे बेचिराख झाले. कोट्यवधी रुपयांच्या चीजवस्तूंची राखरांगोळी झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन दल, आपत्ती प्रतिसाद दल, नौपाडा पोलीस, महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह विविध मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

पाच फायर इंजिन्स, तीन जम्बो वॉटर टँकर, दोन अतिरिक्त वॉटर टँकर, चार रेस्क्यू वाहने, रुग्णवाहिका तसेच खासगी पाण्याचे टँकर यांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

शिंदे यांनी गाडेकर यांना बाहेर काढले, पण दोघांनाही मृत्यूने गाठलेच

महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षारक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. अग्निशमन दलाचे जवान काळू गाडेकर यांच्यासोबत तब्बल अर्धा-पाऊण तास संपर्कात होते. ते नेमक्या कोणत्या बाजूला अडकून पडले याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी सागर शिंदे जिवाची बाजी लावत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेले. शिंदे यांनी त्यांना बाहेर आणलेही; परंतु धुराने गुदमरल्यामुळे गाडेकर आणि शिंदे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सुजित पष्टे (45) आणि तांडेल जाधव (40) हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू आहेत.

झोपलेले 30 विक्रेते धावत सुटले आणि वाचले

या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीसाठी गाळे वितरित करण्यात आले आहेत. मात्र भाजी विक्रीपेक्षा कपडे, चप्पल, बूट विक्रीचा व्यवसाय येथे केला जातो. रात्री या गाळ्यांमध्ये 30 हून अधिक विक्रेते झोपले होते. मात्र आग लागल्यानंतर त्यांनी जिवाच्या आकांताने बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

प्रभाग समिती कार्यालय बंद होते म्हणून मोठा अनर्थ टळला

याच गावदेवी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर महापालिकेचे नौपाडा प्रभाग समिती कार्यालय आहे. इथे अनेक कर्मचारी आणि ठाणेकर नागरिकांचा सतत राबता असतो. त्यामुळे या प्रभाग समिती कार्यालयात गर्दी असते. पहाटेची वेळ असल्याने हे कार्यालय बंद होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख; एकाला नोकरी

महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच वारसांपैकी एकाला महापालिकेत नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. जखमींनाही प्रत्येकी एक लाखाची आर्थिक मदत देऊन उपचारांचा खर्च करण्यात येईल, असेही सांगितले.

Comments are closed.