55 वर्षांचे प्रसाद लाड 44 वर्षांच्या मनोज जरांगेंना मोठे भाऊ, दादा-दादा म्हणत राहिले, फडणवीसांच
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणाऱ्या भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीत आज एक अत्यंत वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. 55 वर्षांचे भाजप नेते, आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटी येथे 44 वर्षांच्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. वयाने मोठे असूनही प्रसाद लाड संपूर्ण संवादादरम्यान जरांगे यांना ‘मोठे भाऊ’, ‘दादा’ असे संबोधत राहिले. या ऑन-कॅमेरा संवादादरम्यान लाड भावूक झाले, तर मनोज जरांगे यांनीही त्यांना आक्रमकपणे आपली मतं व्यक्त केली.
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: फडणवीस यांना देखील कधीतरी समजून घेतले पाहिजे
30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जरांगेंनी दिलेल्या आवाहनाचा स्वीकार करत प्रसाद लाड 22 तारखेलाच अंतरवालीत पोहोचले. यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “मनोज दादांनी 23 तारीख दिली होती, पण मी 22 तारखेलाच आलोय. तुमच्या मनात असलेला द्वेष दूर करायचा होता. मी आमदार किंवा नेता म्हणून नाही, तर समाजाचा एक सामान्य माणूस आणि तुमचा लहान भाऊ म्हणून येथे आलोय. देवेंद्र फडणवीस यांना देखील कधीतरी समजून घेतले पाहिजे. गेल्या 70 वर्षांत कोणत्याच मराठा नेत्याने केलं नाही ते फडणवीसांनी केलं आहे, असे त्यांनी फडणवीस यांची बाजू मांडताना म्हटले. तसेच, “मी राजकारणावर धंदा करत नाही, जातीसाठी माती खायला तयार आहे,” असे म्हणत 30 मे चे उपोषण मागे घेण्याची विनंती देखील प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. तर, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राजीनामा देईल, असे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले.
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: हॉटेलमधील ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताना प्रसाद लाड भावूक
या भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आला होता. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा उल्लेख करताना लाड भावूक झाले. “काल काही लोकांनी मी राहत असलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या आईवरून शिव्या दिल्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं. शिव्या देणे सोपे असते. मात्र, हृदयाला ठेच लागते. मला सांगा मी कुठे येऊ? मला मारा,” असे त्यांनी म्हटले.
प्रसाद लाड यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली: “तुमची आयी आमची आयी, पण…: मनोज जरंगे पाटील
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या भावनिक आवाहनावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत झालेल्या लाठीहल्ल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “तुमची आई आमची आई. ज्या दिवशी आमच्या आईला मारले त्यावेळी आम्ही का बोलू नये तुमच्या आईला? गृहमंत्री फडणवीस आहेत. त्यांनी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्त्याने मारले आणि मुख्यमंत्री म्हणतात की, माझ्या पोलिसांना मारले गेले. म्हणून ते माझ्याकडून बोलले गेले होते, असे त्यांनी म्हटले.”
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: जरांगेंनी मांडला प्रश्नांचा पाढा
यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. 75 वर्षांत बलाढ्य काँग्रेस संपेल असे कोणाला वाटले नव्हते. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका. ओबीसींना 1994 ला कशाच्या आधारावर आरक्षण दिले? छगन भुजबळांची संख्या 4 वर्षांत 60 टक्के कशी झाली? मंडल आयोगाने कोणती जनगणना केली होती, तो सर्वे आम्हाला दाखवा. 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाहीत? हैदराबादचा जीआर असताना वाटप का बंद केले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आता या चर्चेनंतर नेमका काय तोडगा निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Manoj Jarange Patil Demands: मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
२) साताराकोल्हापूर, औंध आणि पुणेमिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
३) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.