पैसाच पैसा… 100 कोटींचा पठ्ठ्या!!! 7 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपला; अल नसर क्लबची रोनाल्डोवर पैशांची उधळण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या तीन वर्षांच्या अपार मेहनतीला अखेर यश आले असून त्याच्या नेतृत्वाखाली अल नसर संघाने ‘Saudi Pro League’चे विजेतेपद पटकावले आहे. रियाधच्या अल-अव्वल पार्क मैदानावर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात अल नसरने दमैक क्लबचा 4-1 असा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयामुळे क्लबचा तब्बल 7 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपला आहे. यापूर्वी अल नसरने 2018-19 च्या हंगामात ही ट्रॉफी जिंकली होती.

या महत्त्वपूर्ण सामन्यात पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो कमालीचा फॉर्मात दिसला. त्याने सामन्यात दोन दमदार गोल केले, ज्यामध्ये एका फ्री-किक गोलचा आणि 81 व्या मिनिटाला किंग्सले कोमॅनच्या पासवर केलेल्या मॅच-विनिंग गोलचा समावेश आहे. सौदी अरेबियात आल्यानंतर रोनाल्डोचे अल नसरसोबतचे हे पहिलेच मोठे अधिकृत जेतेपद आहे. या लीग विजयामुळे रोनाल्डोला त्याच्या करारातील अटींनुसार तब्बल 11 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 105 कोटी रुपये) बोनस म्हणून मिळणार आहेत.

रोनाल्डोने गेल्या वर्षीच अल नसर क्लबसोबत दोन वर्षांचा नवा करार केला आहे. या करारानुसार त्याला दरवर्षी 178 दशलक्ष पाउंड म्हणजेच तब्बल 2200 कोटी हिंदुस्थानी रुपये मानधन मिळते. याशिवाय, मैदानावरील प्रत्येक गोलसाठी त्याला सुमारे 1 कोटी रुपये आणि प्रत्येक असिस्टसाठी (गोल करण्यास मदत करणे) 50 लाख रुपये वेगळे दिले जातात. इतकेच नव्हे तर ‘गोल्डन बूट’ जिंकल्यास कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त इनाम मिळण्याची तरतूदही या करारात समाविष्ट आहे.

Comments are closed.