राज्यात ३० जूनपासून SIR; ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदीची पडताळणी होणार, निवडणूक आयोगाची माहिती
राज्यात ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया (SIR) सुरू होणार आहे. ही प्रक्रिया २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम म्हणाले की, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून विनाकारण वगळले जाणार नाही. याआधी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने एसआयआर प्रक्रियेबाबत चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती. तसेच एसआयआरबाबत ३६ मुद्दे निवडणूक आयोगासमोर निवेदनाद्वारे उपस्थित केले होते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी केली जाणार आहे. या कामासाठी राज्यात तब्बल १ लाख २५३ बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. जनगणनेचे काम संपल्यावर लगेचच या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होईल. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या तपशिलाची खातरजमा केली जात आहे. यामध्ये डुप्लिकेट नावे शोधणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अपडेट करणे आणि जुन्या याद्यांशी मॅपिंग करण्याचं काम केले जाईल, अशी माहिती यावेळी एस चोक्कलिंगम यांनी दिली.
आयोगातर्फे २००२ सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केली जाणार असून, त्यामध्ये आपले किंवा आपल्या पालकांचे नाव जुळतेय का हे पाहण्याचे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या ७२ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रि-डेव्हलपमेंट सुरू असल्याने जे नागरिक दुसरीकडे राहायला गेले आहेत, त्यांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शहरी भागातील कामाचा वेग लक्षात घेऊन आयोगाने Online Self-Mapping चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती डिजिटल पद्धतीने अपडेट करता येईल, असेही ते म्हणाले.
बीएलओ घरी आले असताना कुणी उपस्थित नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही, त्यांना २९ जुलै नंतरही नाव नोंदवता येणार आहे. पडताळणी प्रक्रियेत नागरिकांना त्यांची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे/
मतदार यादी पुनरीक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक:
- २० ते २९ जून २०२६: गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण.
- ३० जून ते २९ जुलै २०२६: बीएलओ प्रत्यक्ष घरी भेट देऊन गणना अर्ज वाटप आणि गोळा करणार.
- ५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार याद्यांची (Draft Voter List) अधिकृत प्रसिद्धी.
- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: प्रारूप यादीवर नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवता येणार.
- ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत: प्राप्त झालेल्या सर्व दावे-हरकती निकालात काढणार.
- ७ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी (Final Voter List) प्रसिद्ध होणार.
Comments are closed.