'बीसीसीआयने रणजी ट्रॉफी बंद करावी..' माजी खेळाडूचा आगरकरांवर संताप!

आयपीएल २०२६ नंतर अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गुरनूर ब्रारसह ३ नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. पण यामध्ये रणजी ट्रॉफीत ६० विकेट्स घेत जम्मू काश्मीरला पहिलं रणजी जेतेपद पटकावून देण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या आकिब नबीची मात्र निवड करण्यात आली नाही. हे पाहून निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर व निवड समितीवर टीका केली जात आहे. आता भारताचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकरदेखील संतापले आहेत.

माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर देखील आकिब नबीला संघात न घेतल्याने संतापले आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ निवडताना जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.

आकिब नबीने २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामात अफलातून कामगिरी करत १० सामन्यांत १२.५६ च्या जबरदस्त सरासरीने तब्बल ६० विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. जम्मू-काश्मीरला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवून देण्यात त्याची मोठी भूमिका होती. या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

२९ वर्षीय या गोलंदाजाने संपूर्ण हंगामात मॅचविनिंग कामगिरी केल्या. हुबळी येथे कर्नाटकविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कल्याणी येथे बंगालविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने सामन्यात एकूण ९ विकेट्स घेत १२३ धावा दिल्या, तर इंदूरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत तब्बल १२ विकेट्स घेत ११० धावा दिल्या. त्याच्या नावावर या हंगामात सात वेळा पाच विकेट्स आणि दोन वेळा चार विकेट्स घेण्याची कामगिरी नोंदवली गेली. अशी उत्कृष्ट कामगिरी असतानाही त्याची निवड न झाल्याने अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाच्या निवड समितीवर टीका केली आहे.

“निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष करणं पूर्णपणे हास्यास्पद आणि गोंधळात टाकणारं आहे. ही कसली निवड प्रक्रिया आहे? हे अजिबात मान्य करता येणार नाही. हा सरळ अन्याय आहे,” अशा संतप्त शब्दांत माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी प्रतिक्रिया दिली.

“आत्ता आकिब नबीची मानसिक अवस्था काय असेल, याची कल्पना करा. रणजी ट्रॉफीत त्याने ६० विकेट्स घेतल्या. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि तो इतरांपेक्षा आधी संधी मिळवण्यास पात्र होता. जर देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीलाच महत्त्व नसेल, तर बीसीसीआयने सरळ देशांतर्गत क्रिकेट बंद करून टाकावं.” असंही वेंगसरकर म्हणाले.

“गोलंदाजाची निवड त्याच्या विकेट घेण्याच्या क्षमतेवर केली जाते. तो १३० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असेल, तरी महत्त्वाचं म्हणजे तो विकेट्स घेतो का. या मुलाने सातत्याने विकेट्स घेण्याची क्षमता दाखवून दिली आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

Comments are closed.