इंधन टंचाईचा परिणाम, शेतकरी संकटात ; लासलगावात 25 मेपासून व्यापाऱ्यांचा शेतमाल लिलावावर बहिष्कार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसे इंधन मिळत नसल्याने मालवाहतूक खोळंबली आहे. पुरेसा इंधन पुरवठा न झाल्यास सोमवार, 25 मेपासून शेतीमालाच्या लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय लासलगाव येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्याबाबत बाजार समितीला लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

राज्यात विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून डिझेल आणि पेट्रोलसाठी पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. तरीही पुरेसे इंधन मिळत नाही. त्यामुळे शेती मशागतीची कामे थांबली आहेत. इंधन टंचाईमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसत आहे. कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी, शेती मशागत, पाइपलाइन व इतर सुविधांसाठी शेतकरी कांदा, धान्य यांसह शेतीमाल विक्रीसाठी बाजार समित्या व जवळच्या गावांमध्ये आणतात. त्याच्या वाहतुकीसाठी इंधनच मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

लासलगाव मर्चन्ट असोसिएशनने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिवांना 20 मे रोजी पत्र दिले आहे. इंधन टंचाईमुळे ट्रान्सपोर्ट एजंटकडून शेतमाल वाहतुकीसाठी अत्यंत कमी ट्रक व अन्य वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे कांदा, धान्यासह शेतीमाल राज्यात व परराज्यात पाठविण्यात अडचणी येत आहेत. व्यापाऱ्यांच्या अडचणीबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून उपाययोजना कराव्यात. इंधन पुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास सोमवार, 25 मेपासून व्यापारी कांद्यासह शेतमाल लिलावात सहभागी होणार नाहीत, असे या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यावर अध्यक्ष नितीन जैन व उपाध्यक्ष ऋषभ राका यांची सही आहे. यासंदर्भात शनिवारी सायंकाळी व्यापाऱयांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

सिन्नर, कळवणमध्ये कांदा रस्त्यावर ओतला
कांदा 1235 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा कळवणमध्ये आज जोरदार निषेध करण्यात आला. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांदा रस्त्यावर ओतून घोषणाबाजी केली. तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करावी, दीड हजार रुपये अनुदान द्यावे, शेती उपयुक्त कामांसाठी ट्रक्टर व वाहनांना पुरेसे इंधन द्यावे, रासायनिक खतांच्या किमती स्थिर ठेवाव्यात, नाफेडमार्फतची खरेदी बाजार समितीत करून त्याची नोंद ठेवावी आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात विलास रौंदळ, महेंद्र हिरे, घनश्याम पवार, काशीनाथ गुंजाळ, संदीप शिंदे, शशीकांत हिरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव मिळावा यासाठी सिन्नर बाजार समिती आवारातही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

Comments are closed.