अग्नी-1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
ओडिशामध्ये यशस्वी झेप : संरक्षण मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने अग्नी-1 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आपल्या संरक्षण क्षमता पुन्हा एकदा मजबूत केल्या आहेत. ही चाचणी 22 मे 2026 रोजी ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून घेण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने आपले सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे त्याची विश्वसनीयता आणि अचूकता सिद्ध झाली.
अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रs (अग्नी-1 ते अग्नी-4) भारतीय सैन्यात आधीच तैनात आहेत. तरीही वेळोवेळी चाचण्या करून त्यातील अचूकता, झेप आणि लक्ष्यभेद याची तपासणी केली जाते. शुक्रवारी करण्यात आलेली ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली घेण्यात आली. भारताच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र प्रणालींसाठी जबाबदार असलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्त्वात चाचणी पार पडली. प्रक्षेपणादरम्यान सर्व प्रक्रिया विहित मानकांनुसार पूर्ण झाल्या. कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
अग्नी-1 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्यो
अग्नी-1 क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटरपर्यंत आहे. त्याचे वजन 12 टन असून ते 1,000 किलो वजनाचे अणुबॉम्ब वाहून नेऊ शकते. अग्नी-1 क्षेपणास्त्र ‘अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लॅबोरेटरी’ने ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी’ आणि ‘रिसर्च सेंटर इमारत’ यांच्या सहकार्याने विकसित केलेले आहे. हैदराबादस्थित ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ने हे क्षेपणास्त्र पूर्ण केले. हे क्षेपणास्त्र सर्वप्रथम 2004 मध्ये सेवेत दाखल करण्यात आले. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र घन इंधनाने बनवलेले आहे.
Comments are closed.