राज्यात सरकारच्या नावावर ‘सर्कस’ सुरू, शेतकरीविरोधी धोरणांवरून अंबादास दानवेंचा महायुतीवर घणाघात
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू असून शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक केली जात असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. सध्याच्या महायुती आणि एनडीए सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असताना सामान्य शेतकरी बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करण्यासाठी प्रचंड संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी हे सुसाट राज्यकर्ते थेट त्यांनाच ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होत आहेत. सरकारने लावलेल्या या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा प्रशासनाने कुठे जप्त केला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर कुठेही कारवाई झाली नसेल तर, मग राज्याचा पुरवठा विभाग झोपला आहे का? अशी विचारणा करत त्यांनी प्रशासकीय कारभारावर बोट ठेवले आहे.
याचसोबत जालना जिल्ह्यातील एका अजब सरकारी आदेशाचे उदाहरण देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जालना जिल्ह्यात ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांकाशिवाय कॅनमध्ये डिझेल दिले जाणार नाही, असा ‘शाही फर्मान’ काढण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत. अनेक गरीब शेतकरी स्वतःचा ट्रॅक्टर परवडत नसल्याने नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणतात. अशा शेतकऱ्यांनी डिझेल कुठून आणायचे, याचे कोणतेही स्पष्टीकरण या आदेशात देण्यात आलेले नाही, याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग… pic.twitter.com/S0tVULaaVu
— अंबादास दानवे (@iambadasdanve) 23 मे 2026
जनतेच्या हातातील हक्काच्या गाड्या हिरावून घेऊन त्यांच्या हातात ‘हातगाड्या’ देणे हाच या सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ दिसतोय, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कारभाराचा पंचनामा करत ‘व्वा रे महायुती आणि व्वा रे एनडीए’ अशा उपरोधिक शब्दांत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
Comments are closed.