शनिशिंगणापुरात न्यायव्यवस्थेचाच अपमान! प्रधान जिल्हा न्यायाधीशांना व्हीआयपी गेटवर १५ मिनिटे अडवले, देवस्थान प्रशासनाची धावपळ

देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिशिंगणापूर देवस्थानात शनिवारी अक्षरशः प्रोटोकॉलचा बोजवारा उडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांनाच मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वारावर तब्बल दहा ते पंधरा मिनिटे अडवून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे ते शासकीय वाहनातून आले होते आणि वाहनावर स्पष्टपणे “जिल्हा न्यायाधीश” असा उल्लेख असतानाही सुरक्षा यंत्रणेने त्यांची चौकशी करत गेट बंदच ठेवले. या अपमानास्पद प्रकारामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी मंदिर प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतल्याने शनिशिंगणापूर देवस्थानात एकच खळबळ उडाली.

शनिवार असल्याने शनिशिंगणापूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यातच दुपारी साडेअकराच्या सुमारास प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे हे सहकुटुंब शनि दर्शनासाठी दाखल झाले. मंदिरातील व्हीआयपी प्रवेशासाठी राखीव असलेल्या गेट क्रमांक दोनवर त्यांचे वाहन पोहोचताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाहन अडवले. वाहनावर न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च जिल्हास्तरीय अधिकाऱ्याचा स्पष्ट उल्लेख असूनही कर्मचाऱ्यांनी “सूचना नाहीत”, “मेसेज आलेला नाही”, “वरून परवानगी नाही” अशी कारणे देत गेट उघडण्यास नकार दिला.

न्यायाधीशच चौकशीच्या फेऱ्यात; देवस्थान प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

सर्वसामान्य भाविकांप्रमाणे प्रधान जिल्हा न्यायाधीशांनाच चौकशीच्या फेऱ्यात उभे करण्यात आल्याने परिसरात उपस्थित भाविकही आश्चर्यचकित झाले. न्यायाधीशांचे वाहन तब्बल दहा ते पंधरा मिनिटे गेटवरच थांबवून ठेवण्यात आले. या काळात सुरक्षा कर्मचारी आणि देवस्थान प्रशासनात गोंधळ उडाला. अखेर फोनाफोनी सुरू झाली आणि काही मिनिटांतच मंदिर प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि जनसंपर्क विभागातील मंडळी घटनास्थळी धावत पोहोचली.

प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच गेट तातडीने उघडण्यात आले; मात्र तोपर्यंत न्यायाधीशांचा संताप अनावर झाला होता. मंदिर परिसरात प्रवेश करताच त्यांनी थेट जनसंपर्क कार्यालय गाठले आणि तेथील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. “हा मंदिर प्रशासनाचा कारभार आहे की थट्टा?” असा सवाल करत त्यांनी सुरक्षा यंत्रणेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला.

एवढा अपमान पुरेसा झाला; कर्मचाऱ्यांची माफी, न्यायाधीशांचा संताप

यावेळी मंदिरातील काही कर्मचाऱ्यांनी “आम्हाला पूर्वसूचना नव्हती”, “मेसेज आला नव्हता” अशी कारणे देत माफी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर न्यायाधीशांनी “जो अपमान झाला तो पुरेसा झाला” अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा न्यायालयातील बिलिफांनाही त्यांनी यावेळी खडे बोल सुनावल्याचे समजते.

न्यायाधीशांच्या संतप्त भूमिकेमुळे मंदिर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः पळापळ उडाली. काही काळासाठी मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दर्शन घेतले; पण देवस्थानाचा सन्मान धुडकावला

या सर्व प्रकारानंतर प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी कुटुंबासह शनि मूर्तीचे दर्शन घेतले. मात्र देवस्थान प्रशासनाकडून करण्यात येणारा कोणताही औपचारिक सन्मान त्यांनी स्वीकारला नाही. दर्शन आटोपल्यानंतर ते तातडीने मंदिर परिसरातून निघून गेले. या प्रकारामुळे दिवसभर शनिशिंगणापूर परिसरात चर्चांना उधाण आले होते.

व्हीआयपी गेटवर आधीच निर्बंध; पण अंमलबजावणीत गोंधळ

मागील महिन्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गेट क्रमांक दोनवर तथाकथित व्हीआयपींच्या प्रवेशाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले होते. सध्या केवळ अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींनाच या मार्गाने प्रवेश दिला जातो. मात्र, खुद्द जिल्हा न्यायाधीशांनाच अडवले गेल्याने देवस्थानातील सुरक्षा व्यवस्थेचा भोंगळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेतल्यानंतर व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले. मात्र त्यानंतर प्रशासनातील समन्वयाचा अभाव, अपुरे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि प्रोटोकॉल हाताळण्यातील हलगर्जीपणा सातत्याने उघड होत असल्याची चर्चा आहे.

चुका झाल्या असतील तर कारवाई होईल – कार्यकारी अधिकारी

या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले की, “देवस्थानातील काही कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक प्रशिक्षित नसल्याने अशा प्रकारच्या त्रुटी घडतात. प्रोटोकॉल संदर्भात काही चुका झाल्या असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना प्रांताधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात येईल आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”

सामान्य भाविकांचा सवाल – न्यायाधीशांची ही अवस्था, मग आमचे काय?

या घटनेनंतर भाविकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ज्यांच्या हातात जिल्ह्याची न्यायव्यवस्था आहे, त्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांनाच गेटवर थांबवून अपमानित केले जात असेल, तर सामान्य भाविकांना मंदिर प्रशासन कशी वागणूक देत असेल?” असा सवाल उपस्थित होत आहे.

शनिशिंगणापूरसारख्या जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या देवस्थानात प्रोटोकॉल, सुरक्षा आणि व्यवस्थापनाचा असा बोजवारा उडणे ही गंभीर बाब मानली जात असून या प्रकारामुळे देवस्थान प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Comments are closed.