देश वाचवण्यासाठी केवळ प्रार्थना करू किंवा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू, चॉईस जनतेचा! इंधन दरवाढीवर रोहित पवार यांची पोस्ट
देशात इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात 2.73 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.81 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल 7.41 रुपयांनी महागले आहे. इंधन दर वाढीचा परिणाम थेट जनतेच्या खिशावर पडत आहे. महागाईने जगणे कठीण होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘दरवाढीमुळे देश ठप्प होत असताना सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसले आहे’, असा टोला लगावतानाच ‘यावर उपाययोजना करण्यास सरकार पूर्णतः असमर्थ ठरत असल्याने हा देश वाचावा यासाठी आपण एकतर केवळ प्रार्थना करू शकतो किंवा व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू शकतो. चॉईस जनतेचा आहे’, असे म्हणत चेंडू जनतेच्या कोर्टात टाकला आहे.
आज पंडीत नेहरु किंवा स्व. इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी वाजपेयी किंवा डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखं जागतिक प्रश्नात हस्तक्षेप करु शकणारं उत्तुंग नेतृत्त्व नसण्याचा जबर फटका देशाला सहन करावा लागतोय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे अडीच रुपये वाढ झाली असून रोजच होणारी ही दरवाढ…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 मे 2026
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेली संपूर्ण पोस्ट:
‘आज पंडीत नेहरु किंवा स्व. इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी वाजपेयी किंवा डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखं जागतिक प्रश्नात हस्तक्षेप करु शकणारं उत्तुंग नेतृत्त्व नसण्याचा जबर फटका देशाला सहन करावा लागतोय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे अडीच रुपये वाढ झाली असून रोजच होणारी ही दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण आहे. या दरवाढीमुळं देश ठप्प होत असताना सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसलंय. यावर उपाययोजना करण्यास सरकार पूर्णतः असमर्थ ठरत असल्याने हा देश वाचावा यासाठी आपण एकतर केवळ प्रार्थना करु शकतो किंवा व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारु शकतो. चॉईस जनतेचा आहे’.
Comments are closed.