सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा, वडेट्टीवार म्हणाले, त

विधान परिषद निवडणूक अरुण लखानी : आगामी विधानपरिषद निवडणुकीत चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवरुन भाजप सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी (Arun Lakhani) यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) यांनी रविवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या लेकीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी हे उपस्थित होते. त्यानंतर भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) अरुण लखानी यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे. याबाबत सोमवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. (Maharashtra Politics news)

अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

अलीकडे विधानपरिषद निवडणुका म्हणजे उत्सव झाला आहे. आमच्या संपर्कातही भाजपचे 100 नगरसेवक आहेत. त्यांच्यातही अंतर्गत वाद आहेत. पण आम्ही या घोडेबाजारापासून आणि फोडाफोडीपासून लांब आहोत. विधानपरिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरला आहे. काही नगरसेवकांना पाच लाख रुपयांचे टोकन देऊन उचलण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणुका होणे आणि योग्य माणसाची निवड होणे दूरच राहिले. अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात. अशाने भविष्यात विधानपरिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील. सामान्य माणूस भविष्यात विधानपरिषदेत दिसणार नाही. एका मतासाठी 15 लाखांचा रेट आहे. नगरसेवकांना इतके पैसे मिळाल्यानंतर त्यांना दिवाळी आहे वाटतं. या सगळ्यामुळे लोकशाही शिल्लक राहील की नाही, हा प्रश्न पडतो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

Chandrapur news: शिवानी वडेट्टीवार विधानपरिषदेची निवडणूक लढवणार की नाही?

शिवानी वडेट्टीवार या चंद्रपूरगडचिरोलीवर्धा विधान परिषदेच्या जागेवरुन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, या निवडणुकीसाठी त्यांचे वय कमी पडत असल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, अद्याप काही ठरलेलं नाही. जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत मी काही निर्णय घेणार नाही. माघार घेतली असं मी आत्ता म्हणणार नाही,आम्ही सगळे चाचपणी करतोय, भाजपचा उमेदवार कोण होतो आणि काय खेळी आहे त्यावर आम्ही निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण

आणखी वाचा

Comments are closed.