विधानसभा 2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? युगेंद्र पवारांनी सांगतिली कार्यकर्त्यांची इच्छा
पुणे : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत असून पुढील काही दिवसांत विधानपरिषद निवडणुकांसाठी (Election) उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये 17 पैकी केवळ 1 जागा मिळणार असल्याचे दिसून येते. एकीकडे विधानपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असतानाच, दुसरीकडे पुन्हा एकदा 2029 मध्ये बारामतीतून विधानसभा कोण लढवणार याची चर्चाही होत आहे. यापूर्वी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत बारामती विधानसभा मतदारसंघातून 2029 ची निवडणूक लढवण्यावर भाष्य केलं होतं. आता, युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनीही 2029 च्या निवडणुकीसंदर्भाने मोठं वक्तव्य केलं आहे. उद्या काहीही होऊ शकतं, तुम्ही 2028 मध्ये मला हा प्रश्न विचारा, असे युगेंद्र यांनी म्हटलं.
युगेंद्र पवार यांनी बारामती संवाद बैठकीबद्दल माहिती दिली. शरद पवारांनी मुंबईतील वाय.बी.सेंटरला एक मीटिंग बोलवली होती, त्याठिकाणी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला होते. लवकरात लवकर तुम्ही पक्षाच्या सर्व नियुक्त्या करा, अशा सूचना आम्ला तिथे देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमचं काम सुरू केल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. तसेच, 2029 मध्ये बारामती विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं.
पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे? उद्या काहीही होऊ शकते, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार नसल्याचे सूचवले आहे. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, 2029 साठी आणखी तीन वर्षे बाकी आहेत. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात, तुम्ही 2028 ला मला विचारा मग मी सांगतो, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.
पद न मिळाल्याने लोकांमध्ये राहता आलं
दरम्यान, पक्षात कुठलंही पद न मिळाल्यासंदर्भात विचारणा केली असता, इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत. कदाचित माझी चुकीची अपेक्षा असू शकते. पण, तसं काही झालं नाही आणि ते माझ्या फायद्याचं ठरलं, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला, मी लोकांमध्ये जाऊ शकलो. काही लोक पद घेतात, पण पदाला न्याय देत नाहीत. मला तसं करायचं नव्हतं. मला पद मिळालं नाही, त्यामुळे बारामतीकरांसाठी वेळ देता आला, असे म्हणत त्यांनी पद न मिळाल्याचं बरंच झालं असेही सूचवलं.
आता विलिनीकरण नाहीच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सगळेच जण संभ्रमात होते, पण विलीनीकरण आता होणार नाही. आपली भूमिका आपण क्लियर केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील क्लियर केलं आहे, आता विलीनीकरण होणार नाही. त्यांचा निरोप, संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी मी बोललो. आता, विलीनीकरण होणारच नाही, असेही युगेंद्र यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.