RTO कडून रिक्षा चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी; रिक्षा अडवून संवाद अन् कागदपत्रांची पडताळणी
ठाणे: राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई, ठाणे (Thane) येथील रिक्षाचालकांना मराठी यायलाच पाहिजे असा आग्रह धरत मराठी सक्ती केली होती. त्यावरुन, राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात रिक्षाचालकांना (Autorikshaow) मराठी आलीच पाहिजे, अशी सर्वांनीच भूमिका घेतली. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय निरपम यांनी या भूमिकेला विरोध करत सक्ती आणि कारवाईला आपला विरोध असल्याचे म्हटले होते. तसेच, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही या कारवाईला विरोध करत कायदेशीर बाजू मांडली होती. त्यानंतर, मंत्री प्रताप सरनाईक आणि वाहनचालक प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत 15 ऑगस्टपर्यंत मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, आरटीओ विभााकडून रिक्षाचालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी आत्तापासूनच सुरू झालीय.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाचालक आणि मालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा येते का, तसेच त्यांच्या परवान्यांची आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अधिकारी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येक रिक्षा चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच, वाहन नोंदणी कागदपत्रे आणि अन्य परवान्यांची तपासणी केली जात आहे. यावेळी चालकांना मराठीत संवाद साधण्यास सांगितल जात असून, त्यांची मराठी समज आणि बोलण्याची क्षमता तपासली जात आहे. त्यामुळे, काही रिक्षाचालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय, तर काहींनी मनात भीती बाळगत विरोधही दर्शवला आहे.
ठाणे शहरात विविध ठिकाणी पथके सक्रीय
राज्यात 15 ऑगस्टनंतर मराठी भाषा न बोलणाऱ्या अथवा आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांवर प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, अनेक रिक्षा चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ठाणे शहरातील विविध भागांमध्ये RTO अधिकाऱ्यांची पथके सक्रीय झाली असून, अचानक तपासणी मोहीम राबवली जात आहे. रिक्षा चालक-मालकांची नोंदणी, कागदपत्रांची वैधता आणि स्थानिक नियमांचे पालन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच मराठी भाषेचा वापर वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे आरटीओ अधिकारी राकेश पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.