बॉल मशीनवरही भारी पडला वैभव! श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला, व्हिडिओ पाहाच
युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने आता बॉलिंग मशीनचा डाव उधळून लावला आहे. त्याने अवघ्या २५ चेंडूंत शतक झळकावले आहे. त्याला श्रेयस अय्यरचा विक्रम मोडण्यात मात्र अपयश आले. जागतिक स्तरावरील अनेक अव्वल दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध वैभव सुरेख फटकेबाजी करतो. जेव्हा त्याची बॉलिंग मशीनशी ओळख झाली, तेव्हा सर्वांना वाटले तो त्याचा सामना करू शकणार नाही, मात्र १५ वर्षांच्या या खेळाडूने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले.
वैभवने बॉलिंग मशीनविरुद्ध अवघ्य २५ चेंडूंत शतक झळकावले, मात्र तो श्रेयसचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला. हे सर्व कुठे आणि कधी घडले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर जाणून घेऊ त्याबद्दल.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल समालोचक केविन पीटरसन सध्या भारतात असून तो यूट्यूब चॅनेलवर अनेक खेळाडूंचे व्हिडिओ शेयर करतो. त्याच्या या यूट्यूब चॅनेलमार्फत तो फलंदाज आणि गोलंदाजांना आव्हान देतो. त्याच्या या स्पेशल शोमध्ये रोहित शर्मापासून ते राशीद खान, यशस्वी जायस्वाल आणि केएल राहुल, तसेच श्रेयसपर्ंत सर्वांचा समावेश आहे. त्याने अशाच एका भागामध्ये वैभवला बोलावले आणि त्याला ५० चेंडूंत १०० धावा करण्याचे आव्हान दिले. यावेळी एक अट होती की प्रत्येक चेंडूचा वेग ताशी एक मैलाने वाढेल. चेंडूचा वेग ताशी ५१ मैलाने सुरू होईल.
वैभवने हे आव्हान स्विकारले आणि केवळ २५ चेंडूंतच शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने काही चौकार आणि काही धावा काढल्या, मात्र सर्वाधिक चेंडूवर त्याने षटकारच मारले. त्याने १४ षटकार, ४ चौकार, २ एकेरी आणि एक दुहेरी धाव काढली. श्रेयसने या शोमध्ये २२ चेंडूंतच शतक पूर्ण केले होते. हा विक्रम मोडण्याची वैभवला संधी होती, मात्र शेवटच्या काही चेंडूंमध्ये तो मोठे शॉट्स खेळू शकला नाही. त्याने १० चेंडूंतच ५३ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने २०२६ चा हंगामही गाजवला आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या धडाकेबाज फलंदाजाने आयपीएलच्या १९ व्या हंगामात आतापर्यंत १४ सामन्यांत ५८३ धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे. यादरम्यान तो एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
Comments are closed.