जेवण जमिनीवर बसून करावे की डायनिंग टेबलवर?
आपल्याकडे वास्तू शास्त्राला विशेष महत्व आहे. यामुळे घरातील वस्तूच नाही तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कृतीचा परिणाम वास्तूवर कसा होतो हे देखील वास्तुशास्त्र सांगते.पण वास्तू शास्त्राचीच दुसरी बाजू ही शास्त्रीय असून जर तुम्ही या दोन्ही बाजूने विचार केलात तर आपले वास्तूशास्त्र हे केवळ समज गैरसमजावर नाही तर शास्त्रावर आधारलेले आहे हे स्पष्ट होते.
जसे की पूर्वी जेवताना जमिनीवर बसून किंवा पाटावर बसून जेवण्याची पद्धत होती. पण हळूहळू काळ बदलला जीवनपद्धती बदलली आणि डायनिंग टेबलावर बसून जेवण्याची पद्धत सुरू झाली. यामागे वास्तुशास्त्र काय सांगते त्याचाही विचार करणे गरजेचे आहे.
जमिनीवर खाली बसून जेवल्याने पायांची हालचाल होते. मांडी घालून बसल्याने गुडघा, स्नायू,लवचिक राहतात.पायात रक्तप्रवाह सुरळीत होतो. जेवून झाल्यावर आपण उठतो तेव्हा कंबरेवर जोर देऊन उठावे लागते.त्यामुळे कंबरेचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे कंबर आखडत नाही. तो स्ट्रेचिंगचाच एक प्रकार आहे.
शिवाय खाली बसून जेवल्याने थेट जमिनीशी आपण जोडले जातो. शरीराचे मूलाचक्र थेट जमिनीशी, धरती मातेशी जोडले गेल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.उठबस केल्याने शरीर सक्रिय राहते. पूर्वी महिला घरातील सगळी कामे करत त्यामुळे शरीराची हालचाल होत असे. त्यामुळे फिट राहण्यासाठी त्यांना वेगळा व्यायाम करण्याची गरज नसे. पण आता सगळ्याच गोष्टींसाठी सुविधा उपलब्ध असल्याने शरीराची हालचाल मंदावली त्यामुळे अन्नपचनाच्या समस्यांसह अनेक व्याधी लहान वयातच अनेकांना जडू लागल्या आहेत.
डायनिंग टेबलवर जेवल्याने शरीराची हालचाल होत नाही. अन्नपचन लगेच होत नाही. दरम्यान, वास्तुशास्त्रातही जमिनीवर बसून जेवणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात दिशेला महत्व असल्याने जेवताना कोणत्या दिशेला बसावे तेही सांगण्यात आले आहे. कारण पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला जेवावयास बसल्याने सकारात्मक उर्जा मिळते. तर दक्षिणेकडे जेवायस बसणे टाळावे असे वास्तुशास्त्र सांगते.
Comments are closed.