FIFA WC 2026: अर्थशास्त्रज्ञाचा तीन वेळा अचूक ठरला अंदाज; आता नेदरलॅंड्सला घोषित केले भावी विश्वविजेते

फिफा विश्वचषक २०२६ चा थरार येत्या १२ जूनपासून सुरू होत आहे. मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेत रंगणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार याचे तर्कवितर्क लावले जात आहे. जेव्हा पॉल ओक्टोपसने २०१० च्या विश्वचषकात जर्मनीच्या सर्व निकालांचा अचूक अंदाज वर्तवला, तेव्हा फुटबॉल प्रेमींनी त्याला भविष्यवेत्ता म्हणून गौरवले होते.

आता एका जर्मन अर्थशास्त्रज्ञाने आपल्या मॉडेलद्वारे पॉलवर मात केली आहे, ज्याने २०१४ पासून विश्वचषक विजेत्याचा अंदाज अचूक सांगितला आहे. योआकिम क्लेमेंट यांनी २०२६ चा विश्वविजेता नेदरलॅंड्स ठरेल अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच त्यांनी याआधी केलेली तीन भाकिते पूर्णपणे खरी ठरली आहेत.

क्लेमेंट यांनी १२ वर्षांपूर्वी गंमत म्हणून फुटबॉल विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी करायला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांना मिळालेल्या परिणामांमुळे त्यांची विश्वासार्हता वाढली. गेल्या १२ वर्षांत त्यांनी तीन फिफा विश्वचषकांची भविष्यवाणी केली असून त्या सर्व खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी २०१४ मध्ये पहिली भविष्यवाणी केली होती. त्यांनी आपला घरचा संघ जर्मनी विश्वविजेता होईल असा अंदाज वर्तवला होता आणि तो योग्य ठरला.

क्लेमेंट यांनी २०१८ मध्येही फ्रान्स विजेता होईल अशी भविष्यवाणी केली, जी पुन्हा एकदा खरी ठरली. जेव्हा २०२२ चा फिफा विश्वचषक कतारमध्ये आयोजित करण्यात आला होता, तेव्हा क्लेमेंट यांनी अर्जेंटिना विजेता होईल अशी भविष्यवाणी केली, जी देखील खरी ठरली. आता त्यांनी २०२६ चा विजेता नेदरलॅंड्स होणार असे भाकीत केले आहे.

नेदरलॅंड्सचा २०२६ फिफा विश्वचषकात कोणाशी सामना होईल हे पण क्लेमेंट यांनी उघड केले आहे. त्यांच्या संगणकीय मॉडेलनुसार या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेदरलॅंड्स, फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, पोर्तुगल, जपान, इंग्लंड आणि अर्जेंटिना हे संघ पोहोचतील. तसेच उपांत्यपूर्ण फेरीचे सामने खालीलप्रमाणे होतील,
नेदरलॅंड्स विरुद्ध फ्रान्स
स्पेन विरुद्ध बेल्जियम
इंग्लंड विरुद्ध जपान
पोर्तुगल विरुद्ध अर्जेंटिना

क्लेमेंट यांच्या मते, नेदरलॅंड्स, इंग्लंड, पोर्तुगल आणि स्पेन हे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ते सामने नेदरलॅंड्स विरुद्ध स्पेन आणि इंग्लंड विरुद्ध पोर्तुगल असे होतील. तसेच अंतिम सामना नेदरलॅंड्स विरुद्ध पोर्तुगल यांच्यात होईल आणि फुटबॉलच्या मजबूत संघांपैकी एक असलेला नेदरलॅंड्स विजेता ठरेल. त्यांनी आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही.

Comments are closed.