मुंबईत उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
मुंबईसह देशभरात उष्णतेने कहर केला आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथे 35 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले असून उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवारी काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने बुधवारच्या वातावरणाबाबत भाकीत करतानाच मान्सूनपूर्व हजेरीचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारी दुपारी किंवा सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून अनेक भागांतील तापमान थेट 38 अंशांवर गेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या उष्णता भयंकर वाढली असून, नागरिकांना मान्सूनच्या हजेरीची प्रतीक्षा लागली आहे. मात्र मान्सूनच्या वाटचालीत कमकुवत वाऱ्यांचा अडसर आला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरील नोंदीनुसार पुढील आठवडाभर मुंबईतील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. ही उष्णतेची स्थिती कायम राहणार असतानाच बुधवारी एक दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Comments are closed.