IPL 2026: 3 चेंडूंतील 2 चुकांमुळे GT चा गेम! RCB च्या कर्णधाराला मिळाले दोन जीवनदान अन् गिल चिडला

आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२६ मे) क्वालिफायर १ सामना खेळला गेला. धर्मशालेत खेळल्या गेलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात जीटीची फलंदाजी खूपच वाईट झाली आणि ते १६२ धावांवर सर्वबाद झाले. त्याचबरोबर अंतिम फेरीत पोहोचण्याची पहिली संधी गमावली. दुसरीकडे आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आणि आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

जीटीचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने २५ चेंडूंत ४३ धावा करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली, मात्र मधल्या फळीत रजत पाटीदारने फलंदाजीला येत संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले. त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने ३३ चेंडूंत ९ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ९३ धावा केल्या. त्याला कृणाल पांड्यानेही चांगली साथ दिली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या जीटीच्या फलंदाजांनी निराशा केली. साई सुदर्शन १४ धावांवर हिट विकेट पडला आणि गिलही २ धावांवर त्रिफळाचीत झाला. विकेटकीपर जोस बटलरने ११ चेंडूंत २९ धावा केल्या. निशांत सिंधू ५ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर ८ धावांवर बाद झाले. जेसन होल्डर तर शून्यावरच बाद झाला. संघ बिकट स्थितीत असताना राहुल तेवातियाने अर्धशतक झळकावून जीटीचा धावफलत हलता ठेवला, मात्र शेवटची मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबीकडून वेगवान गोलंदाज जेकब डफीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. तसेच रसिक सलाम दार आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

या सामन्यात जीटीची गोलंदाज आणि फलंदाजी अत्यंत खराब झाली, मात्र त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्यांचे क्षेत्ररक्षण ठरले. त्यांनी रजतला तीन चेंडूंमध्ये दोनदा जीवनदान दिले. १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चेंडूवर रजत १८ धावांवर असताना त्याचा झेल सोडला. प्रसिद्धने टाकलेला तो चेंडू रजतने लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने बॅटचा फेस लवकर बंद केला आणि चेंडू बॅटच्या कडेला लागला. त्याचवेळी जोस बटलर मागे धावला आणि जेसन होल्डर थर्ड मॅनवरून वेगाने पुढे आला, चेंडू बटलरच्या डोक्यावरून उंच गेला, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना त्याचा योग्य अंदाज आला नाही आणि चेंडू जमिनीवर पडला.

१४ व्या षटकातीलच तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा रजतला जीवनदान मिळाले. कगिसो रबाडाने रजतचा सोपा झेल सोडला आणि गिल खूप चिडलेला दिसला. त्यानंतर मिळालेल्या संधीचे रजतने सोने केले आणि स्फोटक फलंदाजी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले. त्याने अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक केले.

Comments are closed.