रजत पाटीदारने बदलला आरसीबीचा इतिहास! विराट- कुंबळेंनाही जमलं नाही ते करून दाखवलं
आयपीएल 2026 च्या क्वालिफायर-1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा तब्बल 92 धावांनी पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. गतविजेती आरसीबी सलग दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचली असून कर्णधार रजत पाटीदार याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
32 वर्षीय पाटीदारला 2025 हंगामाआधी आरसीबीचे नेतृत्व देण्यात आले होते. कर्णधार म्हणून पहिल्याच मोसमात त्याने संघाचा किताबाचा दुष्काळ संपवला. आता सलग दुसऱ्या वर्षी संघाला फायनलमध्ये नेऊन त्याने इतिहास रचला आहे. आरसीबीला दोन वेळा फायनलमध्ये नेणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे.
गुजरातविरुद्धच्या क्वालिफायरमध्ये पाटीदारने केवळ 33 चेंडूत 93 धावांची तुफानी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. त्याच्या नेतृत्वासोबतच फलंदाजीतही सातत्याने चमक दिसत आहे.
सलग दोन फायनल खेळणाऱ्या कर्णधारांच्या खास यादीत आता पाटीदारचे नाव समाविष्ट झाले आहे. याआधी हा पराक्रम एमएस धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर यांनी केला होता.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010 ते 2013 दरम्यान सलग चार फायनल खेळले होते. त्यानंतर 2018 आणि 2019 मध्येही सीएसके फायनलमध्ये पोहोचली. रोहित शर्माने 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सला सलग विजेतेपद मिळवून दिले. हार्दिक पांड्याने 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सला फायनलमध्ये नेले, तर श्रेयस अय्यरने 2024 मध्ये केकेआर आणि 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरी गाठून दिली होती.
आता आरसीबीसमोर आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर बेंगळुरूने आयपीएल 2026 चे जेतेपद पटकावले, तर सलग दोन हंगाम किताब जिंकणारी ती आयपीएल इतिहासातील तिसरी टीम ठरेल. याआधी चेन्नई सुपर किंग्जने 2010-11 आणि मुंबई इंडियन्सने 2019-20 मध्ये हा पराक्रम केला होता.
आरसीबीला फायनलमध्ये पोहोचवणारे कर्णधार:
अनिल कुंबळे – 2009
डॅनियल विटोरी – 2011
विराट कोहली – 2016
रजत पाटीदार – 2025
रजत पाटीदार – 2026
Comments are closed.