IPL 2026 – बाबाजी का ठुल्लू! गुजरात टायटन्सच्या फोटो सेशनवेळी विराट कोहलीचे अतरंगी चाळे, व्हिडीओ व्हायरल
इंडियन प्रीमियर लीगचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात क्वालिफायनर-1 चा सामना खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात बंगळुरूने गुजरातचा 92 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली. या लढतीपूर्वी दोन्ही संघांचे फोटो सेशन करण्यात आले. यावेळी बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सीमारेषेजवळ उभा राहून अतरंगी चाळे करत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सचे खेळाडू सीमारेषेजवळ त्यांच्या अधिकृत टीम फोटो आणि मीडिया ड्युटीसाठी एकत्र आले होते. सर्व खेळाडू पोझ देऊन उभे असतानाच तिथे आधीच पॅड बांधून सामन्याच्या तयारीला लागलेला विराट कोहली दिसला. गुजरातच्या खेळाडूंना पाहताच विराटने त्यांच्या दिशेने तोंड वेडेवाकडे करत ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवत अतरंगी चाळे करायला सुरुवात केली.
सामना सुरू होण्यापूर्वीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर याच्या क्लिप्स तुफान व्हायरल झाल्या. चाहत्यांनी विराटच्या या बिनधास्त स्वभावाचे तोंडभरून कौतुक केले आहे. बाद फेरीच्या सामन्याचा एवढा मोठा दबाव असतानाही विराट ज्या पद्धतीने वागला त्याला चाहत्यांनी ‘क्लासिक विराट एंटरटेनमेंट’ असे म्हटले आहे.
दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या विराटने आणि त्याच्या संघाने मैदानावर उतरताच गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला. बंगळुरूने या महत्त्वाच्या सामन्यात 92 धावनांनी विजय मिळवला. धर्मशाळा येथील मैदानावर झालेल्या सामन्यात बंगळुरूने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांमध्ये दमदार कामगिरी करत गुजरातला चित केले.
Comments are closed.