Iran US War – मध्यस्थ म्हणून पाकिस्तानची भूमिका वादग्रस्त आणि अडचणीची; अमेरिकन सिनेटचा दावा
दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान सध्या शांतीदूत बनून इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. मात्र मध्यस्थ म्हणून पाकिस्तानची भूमिका वादग्रस्त आणि अडचणीची असल्याचा दावा अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर एक सविस्तर पोस्टही लिहिली आहे.
पाकिस्तान हा मध्यस्थ म्हणून अत्यंत अडचणीचा ठरू शकतो ही बाब मला बऱ्याच काळापासून स्पष्ट झाली आहे. इस्रायलविषयीची त्यांची शत्रुत्वाची भावना ही दीर्घकाळापासूनची आहे. तसेच इराणी लष्करी विमाने पाकिस्तानी हवाई तळांवर आश्रय घेत आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पाकिस्तानच्या सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांनी इस्रायलविरोधात यापूर्वी केलेली वक्तव्येही चिंताजनक आहेत, असे लिंडसे ग्रॅहम एक्स पोस्टमध्ये म्हणाले.
लिंडसे ग्रॅहम यांनी अब्राहम कराराबात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानाचाही दाखला दिला. इस्रायलवर विश्वास नसल्यामुळे पाकिस्तान या करारात कधीही सहभागी होणार नाही, असे ख्वाजा आसिफ म्हणाले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अर्थात हा व्हिडीओ कदाचित वर्षभरापूर्वीचा असला तरी त्यांची भावना आजही कायम असल्याचे आपल्याला वाटते, असेही लिंडसे ग्रॅहम म्हणाले. अब्राहम करारांमध्ये सहभागी होण्याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनाला पाकिस्तानने आताच उत्तर देणे अत्यंत निकडीचे आहे, असेही ते म्हणाले.
मध्यस्थ म्हणून पाकिस्तान अधिक समस्याप्रधान आहे हे मला बऱ्याच काळापासून स्पष्ट होत आहे. इस्रायलशी त्यांचे वैर फार पूर्वीपासून आहे.
हे निर्विवाद आहे की इराणी लष्करी विमाने पाकिस्तानी हवाई तळांवर ठेवली जात आहेत आणि सर्वोच्च स्थानावरून भूतकाळातील भाषणबाजी… https://t.co/ksLqpw4ZQ4
— लिंडसे ग्रॅहम (@LindseyGrahamSC) २६ मे २०२६
इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटले
अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटींना लक्ष्य केले आहे. इराणने या हल्ल्यांना गेल्या 7 आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धबंदीचे घोर उल्लंघन म्हटले असून बदला घेण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी कतारमध्ये चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या मते ही चर्चा यशस्वी होण्यासाठी अजून काही दिवस लागू शकतात.
शांतता चर्चा सुरू असतानाच होर्मुझमध्ये धुमश्चक्री, अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला
इस्रायलकडून लेबनॉनवर भीषण बॉम्बफेक
इस्रायलने लेबनॉनवर 120 हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. गेल्या काही आठवड्यांतील हा सर्वात भीषण हल्ला आहे. दुसरीकडे इराणने अमेरिकेसोबतच्या करारासाठी इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत अशी अट ठेवली आहे.
Comments are closed.