Singapore Badminton Open 2026 – प्रणॉयचा ख्रिस्टीला पराभवाचा धक्का

हिंदुस्थानचा अनुभवी खेळाडू एचएस प्रणॉयने सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मोठा धक्कादायक निकाल नोंदविला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्टीचा तीन गेमच्या थरारक लढतीत पराभव करत प्रणॉयने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.

33 वर्षीय प्रणॉयने तब्बल एका तासाहून अधिक वेळ रंगलेल्या सामन्यात 10-21, 21-12, 21-18 असा शानदार विजय मिळवला. गेल्या पाच वर्षांतील ख्रिस्टीविरुद्धचा हा त्याचा पहिलाच विजय ठरला. याआधी त्याने 2021 इंडोनेशिया ओपनमध्ये ख्रिस्टीवर मात केली होती.

सामन्याची सुरुवात मात्र प्रणॉयसाठी निराशाजनक ठरली. पहिल्या गेममध्ये ख्रिस्टीने आक्रमक खेळ करत मध्यंतरापर्यंत 11-5 अशी आघाडी घेतली आणि सहजपणे 21-10 ने गेम खिशात घातला. मात्र दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने जबरदस्त पुनरागमन करत सामना पालटला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत त्याने मध्यंतराला 11-7 अशी आघाडी घेतली आणि नंतर 21-12 ने गेम जिंकत बरोबरी साधली.

निर्णायक तिसऱया गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीला ख्रिस्टी 6-3 ने आघाडीवर होता. मात्र प्रणॉयने सलग गुणांची कमाई करत 13-11 अशी आघाडी घेतली. अखेरच्या क्षणी ख्रिस्टी 8-16 ने पुढे गेला होता, पण दबावाखाली शांतता राखत प्रणॉयने सलग पाच गुण जिंकले आणि शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. आता दुसऱया फेरीत प्रणॉयसमोर सिंगापूरचा माजी विश्वविजेता लोह किन येव याचे आव्हान असणार आहे.

श्रीकांत, मालविका पराभूत

किदाम्बी श्रीकांत आणि मालविका बनसोड यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. श्रीकांतला लोह कीन यूने 20-22, 21-19, 21-17 असे हरवले, तर मालविकाला चायनीज तैपेईच्या लिन ह्सियांग टीकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला.

ध्रुवतनिष्का जोडीची विजयी सलामी

हिंदुस्थानच्या ध्रुव कपिल व तनिष्का क्रास्टो या जोडीने मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानी जोडीने मलेशियाच्या वोंग तिएन सी आणि लिम चियू सिएन या जोडीचा 21-14, 20-22, 21-13 असा पराभव केला.

Comments are closed.