IPL 2026: वैभवच्या वादळात हैदराबादची राखरांगोळी; कमिन्सला आता होतोय पश्चाताप?

सनरायझर्स हैदराबाद संघाची आयपीएल 2026 मधील मोहीम संपुष्टात आली आहे. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने 47 धावांनी दणदणीत विजय मिळवत हैदराबादला स्पर्धेबाहेर फेकले. 244 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स गमावल्या आणि त्याचा फटका संघाला बसला.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “245 धावांचा पाठलाग करताना काही गोष्टी तुमच्या बाजूने जाणे आवश्यक असते. मात्र आम्ही चुकीच्या वेळी विकेट्स गमावल्या. टॉप-2 मध्ये पोहोचण्यापासून आम्ही थोडक्यात दूर राहिलो, पण खेळाडूंच्या प्रयत्नांवर शंका घेता येणार नाही.”

यावेळी कमिन्सने राजस्थानच्या युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीचे खास कौतुक केले. तो म्हणाला, “वैभवने अप्रतिम फलंदाजी केली. खेळपट्टी फलंदाजांसाठी खूपच चांगली होती. अशा वेळी गोलंदाजांना चुकांची माफी नसते. जर यॉर्कर चुकला, तर तो अजिबात दया दाखवत नाही. आमचा संघ प्रत्येक विभागात संतुलित आहे.”

कमिन्सने युवा गोलंदाज प्रफुल्ल आणि साकिब यांचीदेखील प्रशंसा केली. “प्रफुल्ल आणि साकिब दोघांनी शानदार कामगिरी केली. आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या सर्वात युवा संघांपैकी एक आहोत. कोचिंग स्टाफने काही उत्कृष्ट हिर्‍यांचा शोध लावला आहे,” असे तो म्हणाला.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 244 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचा डाव 19.2 षटकांत 196 धावांत आटोपला. आर्चरने 3 विकेट्स घेतल्या, तर सुशांत मिश्रा, रविंद्र जडेजा आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Comments are closed.