रणजीत मेहनत, पण IPL खेळल्याशिवाय पुढे जाणे अवघड; सिद्धेश लाडने मांडले कडू सत्य

>> गणेश पुराणिक

इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम संपताच मुंबई टी-20 लीगचे बिगुल वाजणार आहे. 1 जून ते 13 जून या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी गतविजेत्या ‘मराठा रॉयल्स’ संघाच्या जर्सीचे मुंबईत अनावरण करण्यात आले. यावेळी सिद्धेश लाड याने ‘सामना ऑनलाईन’शी बोलताना विजेतेपद टिकवण्याचा दबाव, मुंबई क्रिकेटची मानसिक ताकद, रणजी ट्रॉफीचे कमी होत चाललेले महत्त्व आणि टीम इंडियातील निवडीसाठी आयपीएलचे वाढते वर्चस्व यावर परखड मत व्यक्त केले.

विजेतेपद राखण्याचा दबाव असेल का? यंदाच्या हंगामाबाबत किती आत्मविश्वासात आहेस?

विजेतेपद राखण्याचा दबाव नक्कीच असेल. गतविजेते असल्याने प्रत्येक संघाने आमचा अभ्यास केला असेल. पण आम्हीही छोट्या गोष्टी सुधारण्यावर भर देत असून निकालावर नाही, असे सिद्धेश लाड म्हणाला. तसेच आम्ही कायम आत्मविश्वासात असतो. पण योग्य वेळी लय मिळणे खूप महत्त्वाचे असते. आयपीएलमध्येही आपण पाहिले आहे की सुरुवातीला चांगली कामगिरी करणारे संघ शेवटी बाहेर पडतात. टी-20 क्रिकेट पूर्णपणे मोमेंटमचा खेळ आहे. योग्य वेळी खेळाडू फॉर्ममध्ये असणे खूप गरजेचे असते, असेही तो म्हणाला.

गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही स्पर्धेवर पावसाचे सावट आहे, अशा परिस्थितीत खेळण्याचा अनुभव किती उपयोगी पडतो?

मुंबईचे खेळाडू मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितीतून गेलो आहोत. प्रवास असो किंवा सामना वारंवार थांबणे किंवा सुरू होणे, हे सगळं आम्हाला नवीन नाही. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी वेगळं काही तयार करावे लागत नाही. मुंबईचे खेळाडू खूप स्मार्ट असतात, असे सिद्धेश लाड म्हणाला. तसेच यंदाच्या हंगामात आव्हाने खूप असतील, पण तुषार देशपांडे संघात असल्यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत. त्याचा अनुभव आम्हाला उपयोगी पडेल. आम्ही छोट्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करण्यावर भर देत आहोत. योग्य वेळी योग्य संतुलन साधले तर आम्ही पुन्हा विजेतेपद जिंकू शकतो, असा ठाम विश्वासही त्याने व्यक्त केला.

देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष होतंय का? आकिब नबीला संधी मिळायला हवी होती का?

हो, आकिब नबीसारखा खेळाडू निवडीसाठी नक्कीच पात्र होता. त्याने जम्मू-कश्मीर संघाला जवळपास एकहाती विजेतेपद मिळवून दिले. रणजी ट्रॉफी खेळणे अजिबात सोपे नाही. संपूर्ण हंगामात फिटनेस टिकवून कामगिरी करणे खूप कठीण असते. पण आजच्या परिस्थितीत असे वाटते की आयपीएल खेळल्याशिवाय पुढे जाणे अवघड आहे, अशी सत्य परिस्थिती सिद्धेश लाडने उघड केली. यामुळे युवा क्रिकेटपटूंना चुकीचा संदेश जातो. सुरुवातीला सर्वांना सांगितले जाते की रणजीत चांगली कामगिरी केली तर हिंदुस्थानसाठी खेळता येईल. पण प्रत्यक्ष निवड पाहिली की अनेक गोष्टी वेगळ्या दिसतात, असेही तो म्हणाला.

रणजीवर लक्ष द्यावे की एमपीएल-आयपीएलसारख्या स्पर्धांवर?

प्रामाणिकपणे सांगायचे तर मी त्यांना एमपीएल आणि आयपीएलकडे लक्ष द्यायला सांगेन. कारण एखादा खेळाडू 10 वर्ष रणजी खेळूनही हिंदुस्थानसाठी खेळत नाही, पण आयपीएलमधील एका चांगल्या हंगामानंतर त्याला संधी मिळते. त्यामुळे रणजीवरच फोकस करा असे सांगणे कठीण आहे. एमपीएलमध्ये चांगली कामगिरी करणे हा हिंदुस्थानच्या संघात पोहोचण्याचा शॉर्टकट ठरू शकतो, असे म्हणत सिद्धेश लाड याने रणजीचे महत्त्व कमी होत चालल्याची कबुली दिली. सध्या मुंबईच्या खेळाडूंसाठी एमपीएल हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. मागच्या वर्षी विकेट्स थोड्या ओलसर होत्या, त्यामुळे मोठे स्कोअर झाले नाहीत. आयपीएलमध्ये जशा 250 धावांच्या विकेट्स दिसतात, तसे इथे शक्य नव्हते. पण आमच्याकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत आणि योग्य वेळी चांगली कामगिरी करणाऱ्यांना नक्की संधी मिळेल, असेही तो म्हणाला.

रेड-बॉल क्रिकेट तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे?

माझ्यासाठी रेड-बॉल क्रिकेटला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. रेड-बॉलमध्ये जी खरी परीक्षा असते आणि दिवसभर फलंदाजी केल्यानंतर जी समाधानाची भावना मिळते, ती वेगळीच असते. टी-20 मध्ये 10-15 चेंडूत प्रभाव पाडता येतो, पण रेड-बॉल क्रिकेटमध्ये संयम, एकाग्रता आणि तंत्राची खरी कसोटी लागते, असेही तो म्हणाला.

दबावाखाली तू स्वतःला कसं सांभाळतो?

जेव्हा तयारी चांगली असते आणि तुम्ही त्या परिस्थितीचा वारंवार सामना केलेला असतो, तेव्हा दबावात चांगली कामगिरी करता येते. मुंबईचे खेळाडू नेहमी दबावात चांगली कामगिरी करतात कारण ते लोकल पकडण्यापासून ते मैदानावरील स्पर्धेपर्यंत रोजच संघर्ष करत असतात. श्रेयस अय्यर असो किंवा शार्दूल ठाकूर, योग्य वेळी ते संघासाठी उभे राहतात. हे मुंबई क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे, अशी कौतुकाची थाप सिद्धेशने दिली.

टीम इंडियामध्ये गुजरात पॅटर्न; अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन डे संघ जाहीर, गिलच्या आयपीएल संघातील 6 खेळाडूंचा समावेश

Comments are closed.