डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवतीच्या पोटातच बाळ दगावले, फडणवीस सरकार दिल्लीत मुजरे झोडण्यात रममाण
राज्यात इंधन टंचाई नसल्याचे सांगून फडणवीस सरकार दिल्लीत मुजरे झोडण्यात रममाण झाले असतानाच हिंगोली जिल्ह्यात डिझेलअभावी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने गर्भवतीच्या पोटातच बाळ दगावल्याची संतापजनक घटना घडली आहे. देवाभाऊंच्या लाडक्या बहिणीने बाळ गमावल्यानंतर आता जिल्हा परिषदेने वरातीमागून घोडे नाचवायला सुरुवात केली असून, चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून भयंकर डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. डिझेलच मिळत नसल्यामुळे शेतीची मशागत करणारे ट्रॅक्टर जागेवरच थांबले आहेत. मालवाहतूक करणारी वाहनेही रस्त्यावरच उभी आहेत. संपूर्ण जिल्ह्यात डिझेलसाठी मारामार सुरू आहे. रुग्णवाहिकांनाही डिझेल मिळत नसल्याने आरोग्यसेवाही कोलमडली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील मनीषा इंगळे या गर्भवतीला सात महिन्यांनंतर अचानक त्रास होऊ लागला.
मंगळवारी मनीषा यांना नालेगाव येथून दुचाकीवर जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पुरजळकर यांनी तपासणी करून मनीषा यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी तत्काळ 102 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर त्यांनी 108 या क्रमांकावर संपर्क साधला असता, प्रतिसादच मिळाला नाही.
102 आणि 108 क्रमांकांवर वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे शेवटी नातलगांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून मनीषा यांना तत्काळ हिंगोलीला हलवले. तोपर्यंत बराच वेळ निघून गेला. मनीषा यांचा त्रासही वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. गर्भाशयातच बाळ दगावले होते. रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती तर कदाचित बाळ जगले असते असा आक्रोश नातलगांनी केला. बाळ दगावण्यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नातलगांनी केली.
108 क्रमांकाची रुग्णवाहिका पोहोचण्या अगोदरच नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेद्वारे महिलेला हिंगोलीला नेले. गर्भाशयात प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाले होते. बाळाला व्यंग आल्यामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. डॉ. गजानन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी बाळाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जवळा बाजार येथील आरोग्य केंद्रात पथक पाठवण्यात येणार आहे. या पथकाचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना सादर करण्यात येणार असून, त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी साहेब, डिझेल गेले कुठे?
पंधरा दिवसांपासून हिंगोली जिल्हा पेट्रोल, डिझेलसाठी वणवण करतो आहे. शेतीची मशागत थांबली असून, दळणवळणही ठप्प झाले आहे. शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामकसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मुबलक डिझेल पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मग डिझेल गेले कुठे? डिझेल नसल्यामुळे अडलेल्या गर्भवतीला रुग्णवाहिका मिळाली नाही, परिणामी तिचे बाळ दगावले, याची जबाबदारी कुणाची? या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देणार का?
Comments are closed.