हिंगोलीत मिंध्यांची निलाजरी आतषबाजी, ‘शिवसंवाद’च्या नावाखाली पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ!
डिझेलअभावी एका लाडक्या बहिणीने पोटातच आपले बाळ गमावले, दुसरीकडे याच लाडक्या बहिणीच्या जिवावर सत्तेचा मेवा लाटणाऱ्या लाडक्या भावाच्या दिमतीला गाड्यांचा काफिला पाहून हिंगोलीकरांची मान शरमेने खाली गेली! ‘शिवसंवाद’ दौऱ्याच्या नावाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांचे हिंगोलीत निलाजऱ्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. उठता बसता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करणारे मिंधे डीजेच्या दणदणाटात त्यांनी केलेले काटकसरीचे आवाहनही विसरले! सत्तेच्या मदांध जल्लोषात मिंध्यांना एका मातेचे अश्रूही दिसले नाहीत!
हिंगोलीत मिंधे गटाच्या वतीने ‘शिवसंवाद’ दौरा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे हे सायंकाळी वाजतगाजत शहरात आले. त्यांच्या दिमतीला 20 ते 25 गाड्यांचा काफिला होता. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काटकसरीचे आवाहनही मिंधे विसरले. खासदार श्रीकांत शिंदे हिंगोलीत येत असतानाच डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने औंढा तालुक्यातील एका मातेने आपले बाळ पोटातच गमावले. या मातेच्या अश्रूने चिंब झालेल्या रस्त्यावर मिंध्यांनी आतषबाजी करून आपल्या कोडगेपणाचे हिडीस प्रदर्शन हिंगोलीकरांना दाखवले.
डीजेच्या दणदणाटाने हिंगोलीकर प्रस्त
पोलिसांनी डीजे वाजवण्यास मनाई केलेली असतानाही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी जंगी डीजे लावण्यात आला होता. मिंधे येण्याच्या तीन तास अगोदरपासून या डीजेचा दणदणाट हिंगोलीकर सहन करत होते. अत्यंत कर्णकर्कश आवाजामुळे हिंगोलीकर त्रस्त झाले. परंतु आमदारापासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच बेभान असल्यामुळे कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न हिंगोलीकरांना पडला.
शेतकरी, वाहतूकदारांचे दुःखही दिसले नाही
गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण हिंगोली जिल्हा डिझेलसाठी वणवण करतो आहे. शेतकरी, वाहतूकदार डिझेलसाठी पहाटेपासून रांगा लावत आहेत, परंतु दिवसभर थांबूनही डिझेल मिळत नाही. डिझेल नसल्यामुळे शेतीच्या मशागतीला ट्रॅक्टर मिळत नाहीत. दळणवळण ठप्प झाले आहे. डिझेलच्या रांगेत उभ्या असलेल्या नागेश कदम या तरुण शेतकऱ्याचा पिकअपच्या धडकेने मृत्यू झाला. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांना शेतकरी, वाहतूकदारांचे दुःख दिसले नाही.
डीजेच्या गोंगाट प्रकरणी गुन्हा दाखल करा
मागील काही दिवसांपूर्वी शहरासह जिल्हाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नुकत्याच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत डीजेच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी नदिड नाका परिसरात तब्बल 3 तास डीजेचा दणदणाट होता. जिल्हा प्रशासनाने निर्भयपणाने आयोजकांसह डीजेचालकावर नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे यांनी केली आहे.
Comments are closed.