कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान

बिहार बंगला वाद : बिहार सरकारने राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांना पाटण्यातील त्यांचा ऐतिहासिक ’10 सर्कुलर रोड’ हा सरकारी बंगला सोडण्याचा आदेश दिला आहे. मात्र, राबडी देवी यांनी हा बंगला सोडण्यास साफ नकार दिला असून यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. पाटणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहार सरकारला थेट आणि खुलं आव्हान दिलं आहे. कितीही फोर्स बोलवा, पण कोणत्याही परिस्थितीत आपण आपला हा बंगला सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. राबडी देवींच्या या आक्रमक भूमिकेनंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे.

Samrat Choudhary Challenge : ‘कितीही पोलीस फोर्स बोलवा, मी हटणार नाही’

नातू इराज याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन राबडी देवी नुकत्याच दिल्लीहून पाटण्याला परतल्या होत्या. विमानतळावर पत्रकारांनी त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याच्या आदेशाबाबत विचारले असता त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. राबडी देवी म्हणाल्या, “मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी कितीही पोलीस फोर्स बोलावून घर रिकामं करून दाखवावं, मी कोणत्याही किमतीत हा बंगला सोडणार नाही.”

BJP Attack On Lalu Family : ‘हे जंगलराज नाही, कायदा पाळावाच लागेल’

राबडी देवींच्या या विधानावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते नीरज कुमार यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, “राबडी देवीजी, आता बिहारमध्ये पूर्वीसारखं ‘जंगलराज’ उरलेलं नाही. इथे प्रत्येकाला कायद्याचे पालन करावेच लागेल. स्वतःच्या उपचारासाठी तुम्ही सिंगापूरला जाता, नातवाचा वाढदिवस साजरा करायला दिल्लीला जाता, पण जेव्हा बिहारला लुटण्याची वेळ येते तेव्हा इथे पळत येता. हे आता चालणार नाही.”

नीरज कुमार यांनी पुढे सवाल केला की, “शेवटी या ’10 सर्कुलर रोड’च्या बंगल्यात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी असा कोणता खजिना लपवून ठेवला आहे? जर तिथे खजिना दडला असेल, तर बिहार पोलीस तो शोधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.”

JDU Nitish Kumar Reaction : जेडीयू आणि वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जेडीयू (JDU) नेते विजय कुमार चौधरी यांनीही या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत राबडी देवी यांना नियमांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “या सरकारी घर वाटप प्रकरणात जे कायदेशीर नियम आहेत, त्याचे सर्वांनाच पालन करावे लागेल. बिहारमध्ये कायद्यानुसारच कामे होतात.”

तर दुसरीकडे भाजपचे राज्यसभा खासदार भीम सिंह यांनी राबडी देवी यांचं विधान अत्यंत वादग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “त्या बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत, त्यांनी असे कायदा हातात घेणारे विधान करू नये. हा बंगला रिकामा करण्यासाठी संपूर्ण बिहार पोलिसांची गरज नाही, आमचा एक साधा फौजदार जाऊन हे घर रिकामं करून आणेल.”

राबरी देवी नवीन निवासस्थान : राबरी देवीना 39 हार्डिंग रोड बंगला वाटप

बिहार सरकारच्या भवन निर्माण विभागाच्या आदेशानुसार, बिहार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या या नात्याने राबडी देवी यांच्यासाठी पाटण्यातील ’39 हार्डिंग रोड’ येथील नवीन सरकारी आवास अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. हे नवीन घर आधीच त्यांच्या नावावर जारी झाले असूनही, त्यांनी अद्याप जुना ’10 सर्कुलर रोड’ हा बंगला सोडलेला नाही. लालू यादव यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून म्हणजेच 2005 सालापासून याच ’10 सर्कुलर रोड’ बंगल्यात राहत आहे. गेल्या 6 महिन्यांत प्रशासनाने त्यांना नवीन बंगल्यात शिफ्ट होण्यासाठी 2 ते 3 वेळा लेखी विनंती केली होती, मात्र तरीही लालू कुटुंबीयांनी हट्ट सोडलेला नाही.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा

Comments are closed.