आरसीबी आणि गुजरातमध्ये रंगणार अंतिम फेरीचा थरार

सर्वच जण ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते ती घडी आता समोर आली आहे. आयपीएलचा ज्वर टिपेला पोहोचला असताना आता सर्वांचेच डोळे लागले आहेत ते जेतेपदाकडे. कारण आता आयपीएलचा अखेरचा सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आयपीएलचा फायनल ड्राफ्ट कोणता संघ जिंकत जेतेपद पटकावतो, यावर सर्वांची नजर असेल. आरसीबीचा संघ थेटपणे फायनलमध्ये दाखल झाला आहे, तर गुजरात टायटन्सच्या संघाने संघर्ष करत फायनल गाठली आहे. आरसीबी आणि गुजरातसारखे दोन मातब्बर संघ फायनलमध्ये दोन हात करणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरीचा थरार रंगणार असून यामध्ये कोण बाजी मारतो, यासाठी सर्व चाहते आसुसलेले असतील.

आरसीबीच्या कोणत्या खेळाडूंवर असेल नजर…

कोहलीसारखा दिग्गज खेळाडू मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे. त्यामुळे या फायनलमध्ये सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील. वेंकटेश अय्यर आणि देवदत्त पडीक्कल यांच्यासारखे युवा फलंदाज त्यांच्या संघात आहेत. कर्णधार रजत पाटीदार हा मोक्याच्या क्षणी दमदार फटकेबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. टीम डेव्हिडसारखा धडाकेबाज फलंदाजही त्यांच्या ताफ्यात आहे. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार सातत्याने अचूक गोलंदाजी करत आहे, त्याला जोश हेझलवूडची चांगली साथ मिळत आहे. कृणाल पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडू कधी बाजी पलटवेल, हे सांगता येणार नाही.

गुजरातला फायदा घरच्या मैदानाचा…

राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय मिळवत गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे. पण आता त्यांचा जो सामना होणार आहे त्या आरसीबीबरोबर त्यांना गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण या पराभवाचा बदला घेण्याची संधी गुजरातला असेल. सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे गुजरातला यावेळी घरच्या मैदानाचा फायदा असेल.

गुजरातच्या कोणत्या खेळाडूंवर असेल नजर…

गुजरातने क्वालिफायर-2 सामन्यात अव्वल कामगिरी केली. कॅगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि जेसन होल्डरसारखे गोलंदाज अचूक कामगिरी करत आहेत. रशिद खानसारखा दमदार फिरकीपटू संघात असला तरी त्याला गेल्या सामन्यात चांगलाच मार पडला होता. फलंदाजीत शुभमन गिल भन्नाट फॉर्मात आला आहे, त्याला साई सुदर्शनची सुयोग्य साथ मिळत आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि जोस बटलरही धावांचा डोंगर जलदगतीने उभारू शकतात.

विराट कोहली विरुद्ध कागिसो रबाडा

विराट हा मोठय़ा सामन्याचा खेळाडू म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्याचा काटा लवकर काढण्यासाठी गुजरातचा संघ प्रयत्नशील असेल. विराटला लवकर बाद करण्यासाठी गुजरातचा संघ कॅगिसो रबाडाचे अस्त्र बाहेर काढू शकतो. पण विराट कोहली जर टिकला तर मात्र तो गुजरातच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडू शकतो. त्यामुळे विराट आणि रबाडा यांच्या युद्धात नेमका कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

आरसीबी ठरली अव्वल…

आरसीबीने गेल्यावेळी जेतेपद पटकावले होते. गतविजेत्या आरसीबीने या हंगामातही धडाकेबाज कामगिरी केली आहे. या हंगामात सर्वात प्रथम प्ले ऑफ गाठण्याचा आणि सर्वाधिक गुण मिळवण्याचा मानही आरसीबीने पटकावला. प्ले ऑफमध्येही क्वालिफायर-1 च्या सामन्यात गुजरातवर सहज मात करत त्यांनी आपला अव्वलपणा टिकवला आहे. पण आता फायनलमध्ये ते असाच चॅम्पियनसारखा खेळ करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments are closed.