सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या

पुणे : राज्यातील लाडकी बहीण योजनेला (Ladki bahin yojana) सरकारने गेल्या काही महिन्यांत चांगलीच कात्री लावण्यास सुरुवात केली असून ज्या महिलांनी केवायसी (KYC) केली नाही, किंवा ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका करत महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरेंवर जोरदार टीका केलीय. दादा, भाऊ, भाई म्हणणारे नेते आता कुठे गेले आहेत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा, जर केवायसी निकष नसताना पुरूषांनी लाभ घेतला असेल तर त्या पैशांबद्दल अदिती तटकरे यांनी उत्तर द्यावीत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. गरज सरो, वैद्य मरो अशी गत झाली आहे, अर्थ मंत्रालय ज्यांच्याकडे आहे, त्या फडणवीसांनी, सोलो बॅनर लावणाऱ्या एकनाथ शिंदेंनी याची उत्तरे दिली पाहिजे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेत अपात्र केलेल्या महिलांच्या बाजुने सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचं महिलांसाठी काहीही योगदान नाही, केवळ योजनेच्या अपडेट देण्याच्या पलिकडे त्यांनी काहीही केलेलं नाही, असा टोलाही सुषमा अंधारेंनी आदिती तटकरेंना लगावला.

विधानपरिषद म्हणजे भाऊ, बहिण पुनर्वसन योजना

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक नेते आपल्या मुलांसाठी लॉबिंग करताना दिसून येत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये आपल्या मुलांसाठी विधानपरिषदेची जागा मिळवण्यास नेत्यांची धावाधाव दिसत असल्याने सुषमा अंधारे यांनी त्यावरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याकडे जी विधानपरिषद निवडणूक सुरू आहे ते सगळं भाऊ पुनर्वसन योजना, बहिण पुनर्वसन योजना सुरू आहे. शिवसेनेचे महेंद्र दळवी भांडत आहेत त्यांच्या मुलीसाठी, सुनिल तटकरे भांडत आहेत मुलासाठी, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी नेत्यांवरही हल्लाबोल केला.

अशोक खरातचे तुरुंगात पाय चेपले जात आहेत – अंधारे

अशोक खरात कुठे गेला आता? अशोक खरातचे पायं चेपायला काहीजण जात आहेत अशी माहिती आहे. चारच दिवस हातभट्टीच्या दारूवर कारवाई केली जात आहे. पण, पुण्यात भिमनगर, विश्रांतवाडीत 6 भट्ट्या आहेत, येथील 6 हातभट्टीचे धंदे बंद होणार नाहीत. येरवाडा, लमान तांडा इथली हातबट्टी बसणार नाही ह्याची गॅरंटी कोण घेणार? असा सवालही सुषमा अंधारे यांनी पुण्यातील विषारी दारुकांडावरुन उपस्थित केला आहे.

हेही वाचा

पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्…; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.