IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या नावावर ऑरेंज कॅप! शुबमन गिल आणि साई सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास

आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचे स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman gill & Sai Sudarshan) आणि साई सुदर्शन पूर्णपणे अपयशी ठरले. या सामन्यात शुबमन गिल 8 चेंडूत फक्त 10 धावा करू शकला, तर साई सुदर्शनला केवळ 12 धावा करता आल्या. हे दोन्ही खेळाडू बाद होताच वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) इतिहास रचला आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने ‘ऑरेंज कॅप’वर आपले नाव कोरले आहे.

अंतिम सामन्यात खेळणाऱ्या इतर कोणत्याही फलंदाजासाठी आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभवला मागे टाकणे शक्य नाही. अहमदाबादमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र, शुबमन गिल आणि साई सुदर्शनकडे त्याला मागे टाकण्याची संधी होती. परंतु, हे दोन्ही खेळाडू स्वस्तात बाद झाल्यामुळे वैभवचे ऑरेंज कॅपवरील वर्चस्व निश्चित झाले. या सामन्यात खेळणारा विराट कोहली सध्या वैभवपेक्षा 176 धावांनी मागे आहे, त्यामुळे त्याला गाठणे कठीण आहे. विराटने या हंगामात 15 सामन्यांत 50 च्या सरासरीने 500 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वैभव आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएल 2026 हा केवळ दुसरा हंगाम होता. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याने या हंगामात दमदार फलंदाजी केली आहे. राजस्थानच्या संघासाठी खेळताना त्याने 16 सामन्यांत 776 धावा केल्या. या काळात त्याची सरासरी 48.50 आणि स्ट्राईक रेट 237.31 इतका जबरदस्त राहिला. या यादीत त्याच्यानंतर शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 16 सामन्यांत 732 धावा केल्या आहेत, तर 722 धावांसह साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Comments are closed.