मत्ते कप आरसीबीयदेच; आयपीएल जेतेपद राखणारा बंगळुरू तिसराच, कोहलीच्या तडाखेबंद खेळाने आरसीबी अजिंक्य

गेल्या वर्षी अठरा वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती. यंदा त्या तपश्चर्येचं सोनं करून दाखवलं. एकदा राजा होणं अवघड असतं, पण राजा राहणं त्याहून अवघड. आरसीबीने हेच करून दाखवलं. ‘इ साला कप नमदे’चा (यंदा कप आपलाच) नारा देत मिळवलेलं जेतेपद ‘मत्ते कप आरसीबीयदे’ (पुन्हा कप आरसीबीचाच) म्हणत जपलं. गुजरातच्या घरात शिरून, त्यांच्या अंगणातच त्यांचा अभिमान उतरवून आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात स्वतःचं नाव सोनेरी अक्षरांनी कोरलं.

गतवर्षी 18 वर्षांनी साकार झालेले स्वप्न… त्यानंतर त्या जेतेपदाला नजर लागावी, अशा जल्लोषाच्या शोभायात्रेत झालेली दुर्दैवी चेंगराचेंगरी… मग अशा विचित्र स्थितीत दहा महिने झुरत काढल्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीने जेतेपद राखणारी कामगिरी केली. साखळीत अव्वल स्थान पटकावले, मग क्वालिफायर-वनमध्ये एक नंबर कामगिरी केली आणि जगज्जेतेपद राखण्याच्या लढाईत गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरात घुसून पराभव केला. गुजरातचे 156 धावांचे तुटपुंजे आव्हान आरसीबीला भारी पडण्याची शक्यता होती. 9 षटकांत आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले तेव्हाच आरसीबी दबावाखाली तर गुजरात जोशात आला होता. पण विराट कोहलीने जबाबदारी खेळ करत आरसीबीला जेतेपदाच्या पथावरून हटू दिले नाही. टीम डेव्हिडने 24 धावांची आक्रमक खेळी करत गुजरातचे पराभवाचे टेन्शन वाढवले. त्यानंतर विराटने शेवटपर्यंत उभे राहत आरसीबीच्या शिरपेचात दुसऱयांदा मुकुट चढवला. त्याने 42 चेंडूंत 3 षटकार आणि 9 चौकार खेचत 75 धावांची जेतेपदविजेती खेळी साकारली.

जेतेपद राखणारा आरसीबी तिसरा

आयपीएलच्या इतिहासात आजवर चेन्नई (2010 ते 2013, मुंबई (2019-20), गुजरात (2022-23) आणि आता बंगळुरू (2025-26) यांनी सलग दोनदा अंतिम फेरी गाठली आहे. पण गुजरातचा अपवाद वगळता चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू यांनी जेतेपद राखण्यात यश मिळवले आहे. चेन्नईने 2010 आणि 2011 ला जेतेपद पटकावले. मात्र ते सलग चारवेळा जेतेपदाची लढत खेळले.

आघाडीत झाली बिघाडी

रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि खेळपट्टीचा फायदा घेत गुजरातला फलंदाजी देण्याचा जुगार खेळला. गुजरातच्या फलंदाजीला इतके आधार होते की एक कोसळला की दुसरा सावरायला यायचाच, पण आज महत्त्वाच्या क्षणाला साऱयांनीच शरणागती पत्करली. परिणामतः गुजरातने अंतिम लढतीचा सारा रंगच उडवून टाकला. ‘ऑरेंज कॅप’ जिंकण्यासाठी शर्यतीत असलेल्या आणि आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी सलामीची जोडी असा मुकुट मिरवणाऱया शुभमन गिल आणि साई सुदर्शनने मोक्याच्या क्षणी घोर निराशा केली. गिल अवघ्या 10 धावांवर बाद झाला तर सुदर्शनची फलंदाजी चक्र 12 धावांवरच तुटले. एकही षटकार न लगावताच ही जोडी 26 धावांवरच आटोपली. पुढे निशांत सिंधू (20) आणि जोस बटलर (19) हेसुद्धा संघाच्या डावाला काडीचाही आधार देऊ शकले नाही. पहिल्या 12 षटकांत 3 बाद 73 अशी अकल्पनीय धावसंख्या गुजरातने गाठल्यामुळे हा सामना अंतिम फेरीचा आहे की साखळीचा हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता.

आरसीबीच्या गोलंदाजांची कमाल

आरसीबीच्या विजयात नेहमीच सिंहाचा वाटा उचलणाऱया भुवनेश्वर कुमार आणि जॉश हेझलवूडच्या साथीने रसिख सलाम आणि कृणाल पंडय़ाने भन्नाट मारा करत सुरुवातीलाच गुजरातच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्यामुळे गुजरातचा डाव शेवटपर्यंत सावरूच शकला नाही. आघाडीचे चार फलंदाज या चार गोलंदाजांनी टिकून गुजरातला असे हादरवले की नंतर त्यांचा एकही फलंदाज आरसीबीच्या गोलंदाजांना फटके मारू शकला नाही. भुवनेश्वरने 29 धावांत 2 विकेट घेत ‘पर्पल कॅप’वर आपला दावा मजबूत केला तर रसिख सलामने 27 धावांत 3 विकेट घेत आपली करामत आजही दाखवली.

वॉशिंग्टनच सुंदर खेळला

गुजरातच्या सर्वच फलंदाजांनी मोदी स्टेडियमवर घाण केली असतानाही एकटा वॉशिंग्टनच सुंदर खेळला. 8 षटकांत 3 बाद 55 अशी वाईट अवस्था असताना सुंदरचे आगमन झाले आणि त्याने फटकेबाजी न करता संघाचा डळमळीत झालेला डोलारा सावरण्यासाठी पुढील 12 षटके किल्ला लढवला. त्याने शेवटपर्यंत चिकाटी दाखवत 37 चेंडूंत 50 धावांची नाबाद खेळी केली. त्याच खेळीच्या जोरावर गुजरातचा संघ 155 धावांपर्यंत पोहोचू शकला. या डावात गुजरातच्या अर्शद खान आणि राशीद खान या दोघांनी मिळून अवघे 3 षटकार ठोकले. ‘ऑरेंज कॅप’ वैभव सूर्यवंशीच जिंकला.

साखळी सामन्यांच्या शेवटच्या टप्प्यात वैभव सूर्यवंशी ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत टॉप फाईव्हमध्येही नव्हता. मात्र जयपूरमध्ये 93 धावांची तडाखेबंद खेळी त्यानंतर प्ले ऑफच्या दोन्ही लढतींत 97 आणि 96 धावांच्या खेळीने सूर्यवंशीचे वैभव अवघ्या जगाने पाहिले, पण त्याचबरोबर त्याचे हुकलेले विक्रमी शतक पाहून अवघं जगही हळहळलं होतं. शतक हुकल्याचे दुःख त्याच्या चेहऱयावर दिसलेच. राजस्थान एलिमिनीटरमधून बाद झाला तेव्हाही त्याचे अश्रू थांबले नव्हते. पण त्याच्या चार डावांत तीन नव्वदींनी त्याला 776 धावांसह थेट ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत नंबर वनवर पोहोचवले होते. पण काल त्याच्याविरुद्धच्या लढतीतच शुभमन गिल (104) आणि साई सुदर्शन (58) यांच्या वेगवान खेळींनी त्यांना ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत कायम ठेवले होते. आज अंतिम लढतीत वैभवची कॅप उडवण्यासाठी गिलला 51 धावा तर सुदर्शनला 67 धावांची गरज होती, पण आज दोघेही 10 आणि 12 धावांवर बाद झाले आणि ‘ऑरेंज कॅप’ वैभवच्या नावावर झाली. तसेच कॅगिसो रबाडाने पडिक्कलची विकेट घेत 29 विकेटसह ‘पर्पल कॅप’वर आपले नाव कोरले. जर त्याला ही विकेट मिळवता आली नसती तर भुवनेश्वर मानकरी ठरला असता.

Comments are closed.